आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीची लगबग:घनसावंगी तालुक्यात 34 ग्रामपंचायती;  मतदानासाठी 120 मतदान केंद्रे स्थापन

कुंभार पिंपळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या घनसावंगी तालुक्यातील ९७ पैकी ३४ ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी व सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवशी तहसील कार्यालयास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सरपंच पदासाठी १९९ तर सदस्यांसाठी ९४८ उमेदवारांनी नामांकनपत्र दाखल केले.

राज्य सरकारच्या सत्तांतरानंतर तालुक्यातील पहिलीच निवडणूक आहे. सत्तांतरानंतर जनतेतून सरपंच निवडीचा निघालेला आदेशाच्या अनुषंगाने ही निवडणूक पार पडत असल्याने तिला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. सरपंच जनतेतून असल्याने सदस्यासाठी उमेदवार शोधताना गाव कारभाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागली आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला बाजार समितीची निवडणूक येत असल्याने तालुका पातळीवरून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदे गट, ठाकरे गट यांच्याकडून स्थानिक कार्यकर्त्यांना पाठबळ पुरविले जात आहे.

पुढील वर्षात बाजार समिती आणि पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीवर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे बारकाईने लक्ष असणार आहे. शिवाय शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कीर्तीताई उढाण व माजी जिल्हा परिषद सदस्य श्याम उढाण यांची ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे परिसरात बोलले जात आहे. शुक्रवार हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीसाठी सुरुवातीला ऑनलाईन अर्ज भरून त्याची एक प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करण्यास सांगितले होते. मात्र अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेले संकेतस्थळ हे धिम्या गतीने चालत असल्याची ओरडा ओरड तक्रारी सुरुवातीपासूनच होत असल्याने अखेर गुरुवारी सायंकाळी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे जाहीर करण्यात आले होते.

शिवाय शुक्रवारी अखेरच्या दिवशी अर्ज सादर करण्याचा वेळही वाढवून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत करण्यात आला होता. घनसावंगी तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या कुंभार पिंपळगाव च्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी दहा अर्ज तर सदस्यकरिता ९३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी, रास्ते, नाल्या, पुरेशी वीज यासारख्या अनेक समस्या आहेत. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूक लागल्यानंतर विकास कामाचे आश्वासन दिले जाते.

मात्र गेल्या अनेक वर्षापासून अनेक गावात कोणत्याही विकास कामे झालेली नाहीत. शिवाय ऑनलाइन अर्जासाठी अडचणी असल्याने प्रशासनाने ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा देतानाच सायंकाळी साडेपाच वाजे पर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली होती. मात्र इच्छुक उमेदवारांच्या रांगा इतक्या होत्या, की साडेपाच वाजे पूर्वी रांगेत असलेल्या उमेदवारांची रात्री साडेआठ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारणे चालू होते. त्यामुळे प्रशासनाची दमछाक झाल्याची पाहण्यास मिळाली. दरम्यान, खरी लढत तर अर्ज मागे घेण्याच्या दिवसापासून सुरू होणार आहे. मतदानाचा दिवस येईपर्यंत थंडीत रणधुमाळी चांगलीच पेटणार आहे.

टोपे, खरात, उढाण, घाडगेंसह सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळी रणनीती
३४ ग्रामपंचायतीपैकी अनेक ग्रामपंचायतीवर आमदार राजेश टोपे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्या पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी आमदार राजेश टोपे प्रयत्नशील असतील. शिवाय ठाकरे गटाची डॉ. हिकमत उढाण भाजपचे माजी आमदार विलासराव खरात, समृद्धी समूहाचे चेअरमन सतीशराव घाटगे हे देखील ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या रणनीती आखात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकी पाठोपाठ बाजार समितीची निवडणूक आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी सराव परीक्षा म्हणून बघण्यास सुरुवात केली आहे या निवडणुकीवरून बहुतांशजणांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...