आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य यंत्रणेवर ताण:आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच 377 पदे रिक्त; टोपे म्हणतात, भरतीचा प्रस्ताव पाठवा, मंजुरी देऊ

जालना11 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जिल्ह्यात कोरोनाबाधितांसह मृतांची संख्या झपाट्याने वाढतेय

जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला असून दररोजचे मृतांसह बाधितांचे आकडे चिंता वाढवत आहेत, तर दुसरीकडे तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स, नर्सेससह आरोग्य कर्मचारी मिळत नसल्याने रुग्णांवर उपचार करायचे कसे, रुग्णांचा जीव वाचवायचा कसा, कोरोनाला रोखायचे कसे हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा जिल्ह्यातील १० शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ३७७ पदे रिक्त आहेत. यावर पर्याय म्हणून पदवी, पदविका पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स, नर्सेस भरतीचे प्रस्ताव द्या, त्याला तत्काळ मंजिरी देऊ, असे मंत्री टोपे यांनी सांगितले. त्यामुळे ही पदे भरली जाईन प्रत्यक्ष रुग्णसेवेत कधी दाखल होतील, याकडे जालनेकरांचे लक्ष लागले आहे.

कोविड -१९ हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय (डिस्ट्र्क्ट कोविड हॉस्पिटल), जीएनएम नर्सिंग कॉलेज जालना, ग्रामीण रुग्णालय राजूर, उपजिल्हा रुग्णालय अंबड, ग्रामीण रुग्णालय घनसावंगी, ग्रामीण रुग्णालय मंठा, ग्रामीण रुग्णालय भोकरदन, ग्रामीण रुग्णालय परतूर, जिल्हा रुग्णालयांतर्गत (अग्रसेन भवन) कोविड केअर सेंटर (डिस्ट्रिक्ट कोविड हेल्थ सेंटर) या १० शासकीय संस्थांमध्ये भिषक (फिजिशियन), भूलतज्ञ (अॅनेस्थेटिक कम इन्टरवेनिस्ट) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस, बीएएमएस) असे उपचारात महत्त्वाची भूमिका बजावणारे तज्ञ उपलब्ध होत नसल्यामुळे आहे त्या डॉक्टर्सवर ताण पडत अाहे. या दहा आरोग्य संस्थांमध्ये एकूण ११८० बेड असून त्यासाठी १२५० पदांची आवश्यकता अाहे. मात्र, यातील केवळ ८७३ पदे भरलेली असून ३७७ पदे रिक्त आहेत.

चला, सगळे मिळून कोरोनाला हरवूया
राज्यात व आपल्या जिल्ह्यातही कोरोनाचे संकट आता अधिक गंभीर होत चालले आहे. अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना आता अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आपल्याला पुढे येण्याची गरज आहे. या संकटसमयी वैद्यकीय व्यावसायिकांनी सेवाभाव दाखवण्याची गरज आहे. शासकीय रुग्णालयात योगदान देणे असो किंवा शासनाने ठरवून दिलेल्या दरात कोरोना रुग्णाला उपचार देणे याचे पालन होणे आवश्यकच आहे. आज शासकीय कोविड उपचार केंद्रात डॉक्टर,नर्स, वॉर्ड बॉय, ईसीजी टेक्निशियन ते अगदी औषध निर्माता अशा जवळपास ३७७ जागा रिक्त आहेत. ५६ डॉक्टरांना नियुक्तीचे आदेश पाठवले. त्यापैकी एक जण रुजू झाला. याही परिस्थितीत आपले पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उत्कृष्ट कार्य करीत आहेत. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला. परंतु तरीही रस्त्यावर आपण गर्दी करतोच आहोत. असे असेल तर एकटे प्रशासन हा लढा कसा लढू शकेल? त्यासाठी आपल्या सगळ्यांना अधिक जबाबदार व्हावे लागेल. प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची समजदारी आता दाखवावीच लागेल. कारण आपण समजदार व जबाबदार झालो तर कोरोनाला हरवणे सहज शक्य आहे. चला तर मग, आजपासूनच निश्चय करूया. सर्व मिळून कोरोनाला हरवूया.

महत्त्वाची पदे अशी
पदे आवश्यक पदे भरलेली पदे रिक्त पदे

 • भीषक ४८ ०३ ४५
 • भूलतज्ज्ञ ४८ ०३ ४५
 • वैद्यकीय अधिकारी १४१ ८१ ६०
 • स्टाफ नर्सेस ५१७ २९८ २१९
 • अौषध निर्माता २० १२ ०८
 • एक्स-रे टेक्निशियन ०४ ०४ ००
 • ईसीजी टेक्निशियन ०४ ०४ ००
 • वॉर्ड बॉय २३४ २३४ ००
 • स्विपर/क्लीनर २३४ ०० ००
 • एकूण १२५० ८७३ ३७७

२ मे रोजी मुलाखती
वैद्यकीय अधिकारी (स्त्री-पुरुष) या कंत्राटी पदासाठी अर्ज मागवण्यात आले असून येत्या २ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून याच दिवशी मुलाखती होणार आहेत. जि.प. परिसरातील कृषी सभागृहात मुलाखती होणार असून उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी केले आहे.

दहा आरोग्य संस्थांत ११८० बेड असून त्यासाठी १२५० पदांची आवश्यकता
नियुक्ती आदेश देऊनही डॉक्टर्स, कर्मचारी रुजू होईनात : जिल्हाधिकारी यांची मंजुरी घेऊन आरोग्य विभागाकडून नियमित जाहिराती प्रसिद्ध करून थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात येत आहे. यानुसार उमेदवारही मुलाखतीला येत असून पात्र उमेदवारांना तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले जात आहेत. मात्र, काही जणांकडून रुजू होण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे रिक्त पदे कायम राहत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...