आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक पोलिसांच्या रडारवर:महिन्यात 4 कारवाया; 57 लाखांचा गांजा जप्त, ट्रॅव्हल्ससह ट्रक पोलिसांच्या रडारवर

जालना2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळलेला गांजा चोळून त्यातून बी काढून काही शेतकरी चोरून-लपून गांजाची शेती करीत आहेत. महिनाभरात चार ठिकाणी कारवाया करून तब्बल ५७ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. वारंवार होत असलेल्या कारवायांमुळे जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांत गांजा तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस तपासात समोर आली. या अनुषंगाने शहरातून ये-जा करणाऱ्या ट्रॅव्हल्स, ट्रान्सपोर्टमधील ट्रक, अवजड वाहने पोलिसांच्या रडारवर आहेत. दरम्यान, गतवर्षी आंध्र प्रदेशातून गांजा आणणारे व अंबड येथील गांजा खरेदी करणारे दोघे दहा महिने कारागृहात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा जामीन झाला आहे.

जालना शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गांजा आढळून येण्याचे प्रकार अनेकदा घडत आहेत. दरम्यान, महिनाभरात बदनापूर, मंठा, तालुका जालना, गोंदी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करून लाखो रुपयांच्या गांजाची झाडे जप्त केली. या कारवायांचा पोलिसांनी गांजाची झाडे कधी लागवड केली जातात, शेतकरी ते बी कोठून आणतात, गांजा उगवून आल्यानंतर तो कसा विक्री करतात, गांजा खरेदी करण्यासाठी कोण येतो, त्याचा भाव कसा ठरला जातो, गांजा विकत घेणारा कोठे नेऊन विक्री करतो याबाबतचा सर्व तपास पोलिसांकडून केला जात आहे.

यातून जालना जिल्ह्यात अवैधरीत्या गांजाची लागवड झालेल्या मळ्यांमधून गांजाची इतर जिल्ह्यांत तस्करी होत असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ट्रक, ट्रॅव्हल्स या वाहनांतून हा गांजा पार्सल होत असल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे. या अनुषंगाने पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. गांजाचा गुन्हा करणारे संशयित आरोपी, त्यांच्या संपर्कात असणारे, गांजाची खरेदी करणारे, कुठे विक्री होतेय का या सर्वांचाच पोलिस यंत्रणा शोध घेत आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह प्रत्येक ठाण्यातील विशेष शाखा, डीबी पथके या अनुषंगाने कामाला लागली आहेत.

गांजाची शेती केल्यावर काय आहे शिक्षा : अमली पदार्थांचे सेवन, साठवणूक, विक्री किंवा उत्पादन अथवा लागवड केल्यास कारवाई केली जाते. अमली पदार्थ हा कमी प्रमाणात आढळून आला तर सहा महिन्यांपासून तर एक वर्षापर्यंत कठोर, सक्त कारावास व दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच अमली पदार्थ हा जास्त प्रमाणात आढळला तर २० वर्षांपर्यंत कठोर कारावास, १ लाख रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

सर्व बाजूंनी तपास सुरू
वंजार उम्रद येथे कारवाई केल्यानंतर तो शेतकरी कुणाला गांजा विक्री करीत होता, परजिल्ह्यात विक्री होतेय का, त्याच्याकडून कोण खरेदी करीत होता या अनुषंगाने तपास सुरू आहे. ट्रॅव्हल्स, ट्रान्सपोर्टबाबतही खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपास केला जात आहे.- संभाजी वडते, उपनिरीक्षक, तालुका ठाणे, जालना.

अमली पदार्थांची माहिती द्या
अमली पदार्थांची विक्री, वाहतूक अथवा साठवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास ही माहिती पोलिसांना द्या. अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक झाली. कारवाईच्या अनुषंगाने प्रशासनाला आदेशही दिले आहेत.- डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी

बातम्या आणखी आहेत...