आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रखडला होता रस्ता:मंठा येथील रेणुकादेवी मंदिर रस्त्यासाठी चार कोटी मंजूर, लवकरच कामास प्रारंभ

मंठाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याचे आराध्य दैवत म्हणून पंचक्रोशीत ख्याती असलेल्या मंठा येथील रेणुकादेवी मंदिर रस्त्यासाठी चार कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. माजी मंत्री तथा परतूर मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून हा निधी प्राप्त झाला असून लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल असे सांगण्यात येत आहे.

राजकीय श्रेयवादामुळे मागील अनेक वर्षांपासून रेणुका देवी मंदिर रस्त्याचे काम रखडत चालले होते. रस्त्यावरील खड्डयामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. अनेक दिवसापासून भाविक या रस्त्याची मागणी करीत होते, शेवटी नाबार्डच्या माध्यमातून आमदार बबनराव लोणीकर यांनी रस्त्यासाठी चार कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. याच प्रमाणे तालुक्यातील पाटोदा येथील पूल बांधकामासाठी देखील सात कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.रेणुका देवी मंदिर रस्त्यामुळे केवळ भक्तांचीच नव्हे तर तालुक्यातील नागरिकांची सोय होणार आहे.

कारण याच रस्त्याने पुढे न्यायालय,तहसील कार्यालय,भूमी अभिलेख कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,आयटीआय, कस्तुरबा गांधी विद्यालय,रेणुका विद्यालय तथा महाविद्यालय यासारख्या कार्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना जाण्यासाठी मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येकाची मोठी सोय होणार आहे. रेणुका देवी मंदिराचा रस्ता प्रशस्त होत असल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. रेणुका देवी मंदिर संस्थानाचा तीर्थक्षेत्र पर्यटन अंतर्गत विकास होणे गरजेचे आहे.

रेणुका देवी मंदिर संस्थानात वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. देवीच्या दर्शनासाठी दूरवरुन भाविक हजेरी लावतात. तीर्थक्षेत्र पर्यटन अंतर्गत या देवस्थानाचा विकास झाला तर अनेक छोट्या व्यावसायिकांना देखील रोजगार मिळू शकतो. नाबार्डच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास निधीतून लवकरच रेणुका देवी मंदिर रस्त्याचे आणि पाटोदा येथील पूल निर्मितीचे काम सुरू करण्यात येईल,असे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...