आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अंत्योदय, केशरी कार्डधारकांना 100 रुपयांत 4 शिधावस्तू; पात्र लाभार्थींना दिवाळीनिमित्त होणार वाटप

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा दिवाळीनिमित्त अवघ्या १०० रुपयांत ४ शिधावस्तू वाटपाचा निर्णय शासनाने घेतला असून अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब व औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरीक्त प्रत्येकी एक किलाे रवा, एक किलाे चणा डाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेलचा संच दिला जाणार आहे. जालना जिल्ह्यातील चार लाख ९६ हजार ५३२ लाभार्थींना याचा लाभ मिळणार असून पुरवठा विभागाकडून वाटपाचे नियोजन हाती घेण्यात आले आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थींना दिवाळीपूर्वी या वस्तूंचे वाटप करण्यासंदर्भात सर्व पुरवठा नायब तहसीलदारांची बैठक घेऊन तशा सूचना प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अंजली कानडे यांनी गुरुवारी दिल्या. शिवाय सदरील वस्तूंची मागणी शासनाकडे नोंदवली आहे.

संपूर्ण राज्यभरासाठी हा निर्णय असल्यामुळे त्यानुषंगाने गुरुवारी सकाळी पुरवठा विभागाच्या सचिवांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्ह्यांकडून त्या-त्या वस्तूंची मागणी नोंदवण्याचे आवाहन केले. यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात या विषयावर नियोजन सुरू होते, तर शासनाकडून प्राप्त सूचनेवरून पुरवठा कंत्राटदार महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनलाही कळवण्यात आले.

शिधावस्तू सुट्या नको, संचच हवा
उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रत्येक शिधावस्तू संचात एक किलाे रवा, एक किलो चणा डाळ, एक किलाे साखर व एक लिटर पामतेल समाविष्ट असून प्रत्येक पात्र शिधापत्रिकाधारकास प्रति शिधापत्रिका एक संच वितरित करणे अनिवार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत संचातील शिधावस्तू सुटे करून वितरित केले जाणार नाहीत याची संबंधितांना दक्षता घ्यावी लागणार आहे.

निकृष्ट दर्जाच्या शिधावस्तू स्वीकारू नका
पुरवठा कंत्राटदाराने शिधावस्तू संच संबंधित तालुक्याच्या गोदामापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. या संचात समाविष्ट वस्तू एफएसएसएआय मानकाची पूर्तता करीत असल्याचे एनएबीएल अधिस्वीकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र कंत्राटदाराकडून प्राप्त करून घेऊन त्यानंतरच िशधावस्तू संच स्वीकारावेत. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या शिधावस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पुरवठा विभागाचे उपसचिव ने. प्र. मानकामे यांनी िदले आहेत.

जिल्ह्यातील लाभार्थी संख्या
अंत्योदय अन्न योजना ४३४११
प्राधान्य कुटुंब ४२३२११
एपीएल (केशरी) २९९१०
एकूण ४९६५३२

बातम्या आणखी आहेत...