आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अतिवृष्टी, पूरबाधितांसाठी चारशे कोटींचे अनुदान

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे बाधित खरीप पिकांच्या नुकसानीपोटी सरकारने जिल्ह्यातील ३ लाख ६९ हजार ६८० शेतकऱ्यांसाठी ३९७ कोटी ७३ लाख १४ हजारांचे अनुदान मंजूर केले. विभागीय आयुक्तांनी २१ नोव्हेंबर रोजी ही रक्कम जालना जिल्हाधिकारी यांच्या खात्यात वर्ग केली असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पावसाने खरीप हंगामाच्या सुरूवातीपासूनच थैमान घातल्यामुळे जुलै-ऑगस्टदरम्यान ६ हजार ८९८ शेतकऱ्यांचे २ हजार ३११ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. शासनाने याचे ३ कोटी ७१ लाख रुपये शेतकऱ्यांना वितरीत केले. मात्र, पुढेही पावसाचा जोर कायम राहिला व अतिवृष्टी, पुर आणि सततच्या पावसामुळे तब्बल ४ लाख २४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

याचा जालना जिल्ह्यातील ५ लाख ९८ हजार ६९६ शेतकऱ्यांना फटका बसला. यात प्रामुख्याने सोयाबीन, मका, कापूस, तूर, ऊस यासह मोसंबी फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली.

१ जून ते ३१ ऑक्टोबर या पाच महिन्यात जिल्ह्यात ९५० मि.मी. अर्थात १४३.३५ टक्के एवढा पाऊस झाला, यामुळे शेती पिकांबरोबरच जमीनही खरडून गेली. यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी नुकसानीचा अहवाल स्थानिक अधिकाऱ्यांकडून मागवून घेत अपेक्षित मदतीची मागणी शासनाकडे केली होती. याआधारे अनुदान प्राप्त झाले असून ते तहसीलमार्फत बँकेत पाठवून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिले आहेत.

महिनाअखेर अनुदान वाटप
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून संबंधितांचे बँक खाते क्रमांकही संकलित केले आहेत. तसेच ज्यांच्या बँक खाते क्रमांकात त्रुटी आहेत, त्याची पूर्तता करून घेतली जात आहे. प्राप्त अनुदान व शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच बँकांना पाठवून महिनाअखेर वाटपही सुरू होईल. -केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना

वाढीव दराने मिळणार अनुदानाची रक्कम
जुन ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे होणाऱ्या शेती पिक तसेच मालमत्तेच्या नुकसानी साठी ३ हेक्टरच्या मर्यादेत वाढीव मदत देण्याचा शासन निर्णय शासनाने २२ ऑगस्ट रोजी काढलेला आहे. त्यानुसार जिरायती पिकांच्या नुकसानी साठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायतीसाठी २७ हजार तर बहु वार्षिक अर्थात फळ पिकांसाठी हेक्टरी ३६ हजारांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...