आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात 11 महिन्यांत 46 खून:भांडणातून 22, प्रेम-अनैतिक संबंधातून 6, तर प्रॉपर्टीच्या वादातून 18 जणांना संपवले

लहू गाढे | जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीरपिंपळगाव येथील खुनाच्या घटनेत पोलिसांनी हाडे व राख जप्त केली. - Divya Marathi
पीरपिंपळगाव येथील खुनाच्या घटनेत पोलिसांनी हाडे व राख जप्त केली.

जालना जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी त्या गुन्ह्यांतील आरोपींना पकडण्याचे व गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण चांगले आहे. मागील अकरा महिन्यांमध्ये ४६ खुनाच्या घटना घडल्या आहेत. यात एक खुनाचा गुन्हा तपासाविना प्रलंबित आहे. किरकोळ वाद, पूर्ववैमनस्य, कौटुंबिक वाद या कारणांवरून सर्वाधिक खुनाच्या घडल्या आहेत.

परंतु, मागील काही महिन्यांमध्ये पत्नीने वकील पतीचा, अल्पवयीन मुलीने बहिणीचा तर दोन दिवसांपूर्वीच पिर पिंपळगाव येथे वडील व चुलत्याने मुलीला गळफास देऊन केलेल्या खुनाच्या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे. विचित्र असलेल्या या तीन खुनाच्या घटनांनी समाजमन हळहळले असून, गंभीर खुनांच्या या घटनांचा जालन्यात जन्मच झाल्याचे दिसून आले आहे. खुनाच्या घटनांनी जालना हादरला असून, अब तक ४६ मर्डर अशीच स्थिती झाली आहे.

गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने केलेल्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे वाढत्या घटनांवरून दिसून येते. आता तर खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचे एक सत्रच जिल्ह्यात सुरू झाले आहे. अवघ्या अकरा महिन्यांच्या काळात खुनाच्या तब्बल ४६ घटना घडल्या आहेत. त्यात घरगुती वादापासून तर दारूसाठी पैसे न देण्याच्या क्षुल्लक कारणावरूनही थेट खून केल्याचे दिसत आहे. खुनांच्या घटनांवरून दखल घेत उर्वरित कालावधीत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करणे गरजचे आहे.

चाळिशी-पन्नाशीतील सर्वाधिक आरोपी

काही खुनाच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुले, मुलीही पाेलिसांच्या तपासात समोर आल्या आहेत. खुनाच्या घटनांमध्ये विशेषकरून चाळिशी-पन्नाशीतील आरोपींचे जास्त प्रमाण असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी तपासातून जवळपास ४९ गु्न्ह्यांतील आरोपींना अटक केली आहे.

४२ जणांचे आढळून आले मृतदेह

रेल्वे पटरी, खून करून टाकणे, पूल अशा विविध ठिकाणी चालू वर्षातील अकरा महिन्यांमध्ये ४२ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. अनेक मृतदेहांची ओळख न पटल्यामुळे नगरपालिकेने त्यांच्यावर अंत्यविधीही केले आहेत.

पोलिसांशी तत्काळ संपर्क साधा

किरकोळ वाद विकोपाला जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कुठे वाद निर्माण झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे. खुनांच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न असतोच. खुनांच्या गुन्ह्यांत बहुतांश तपास झालेलेच आहेत. - अक्षय शिंदे, पोलिस अधीक्षक, जालना.

बातम्या आणखी आहेत...