आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा अनुदानाची:भोकरदन तालुक्यातील 63 हजार शेतकऱ्यांच्या नजरा अनुदानाकडे

पिंपळगाव रेणुकाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबर व आक्टोंबर महिन्यात भोकरदन तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वच खरिप पिकाचे नुकसान झाले होते. या अनुषंगाने भोकरदन महसुल प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करीत सदर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. यानुसार शासनाने देखील याची दखल घेत भोकरदन तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७४ कोटी ८ लाख ७५ हजार ५८० रुपये मदत जाहीर केली असली तरी त्या मदतीचे अद्यापही भिजत घोंगडे कायम असल्याने तालुक्यातील ६३ हजार शेतकऱ्यांच्या नजरा दुष्काळी अनुदानाकडे लागल्या आहेत. तर दुसरीकडे मदतीसाठी आणखी कागदपत्रे जमा करण्याचा फतवा महसुल खात्याकडून काढण्यात आला आहे.

यंदा भोकरदन तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे खरिप हंगामातील पिके चांगलीच बहरली होती. परिणामी चांगले उत्पादन यंदा हाती लागणार असल्याच्या अपेक्षा शेतकऱ्यांच्या वाढीस लागल्या होत्या. माञ पेरणी नंतर पावसाने देखील सततधार लावुन धरल्याने कोवळी पिके पिवळी पडून त्यांची वाढ खुटली होती. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी महागडी औषधी फवारणी करुन खताचे महागडे डोस देऊन पिके हातात आणली. पंरतु निसर्गाच्या मनात काही औरच असल्याने यंदा देखील सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पावसाने धूमाकुळ घातला.

सातत्याने झालेल्या पावसाने खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक भागात जमिनीत पाणी साचल्याने सोंगणी केलेले सोयाबीन पिके पूर्णतः वाया गेली. पिवळी पडून त्यांची वाढ खुंटली. शिवाय वादळी वाऱ्यात शेकडो हेक्टरवरील मका पिक जमिनीवर आडवे झाले. तर कपाशीच्या शेतात पाण्याचे डोह साचले. त्यामुळे कपाशीच्या कैऱ्या देखील काळवंडल्या. पिके ऐन घरात येणाच्या काळातच निसर्गाने घाला घातल्याने शेतकरी रस्त्यावर आले. शिवाय अधिक पावसामुळे शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणारे मिरची पिक देखील पूर्णतः उद्ववस्त झाले. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकाचे त्वरीत पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी लोकप्रतिनीधी, विविध सामाजिक संघटना, शेतकरी आदींनी केली होती.

त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा सुचना महसुल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार कृषी व महसुल विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पंचनामे करुन सदर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. या अनुषंगाने शासनाने दखल घेत भोकरदन तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७४ कोटी ८ लाख ७५ हजार ५८० रूपये मंजुर केले. या अनुदानाचा लाभ तालुक्यातील ६३ हजार ६५४ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

माञ शासनाने मदत जाहीर करुन बराच कालावधी लोटला असला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही सदर मदत वर्ग झाली नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. अतिवृष्टीमुळे खरिपातुन अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे दैनंदिन खर्चाचे देखील वांदे झाले आहे. त्यामुळे शासनाने केलेल्या मदतीची शेतकऱ्यांना मोठी आस लागून आहे. एकीकडे शेतकरी मदतीची वाट पाहत असताना महसुलकडून पुन्हा शेतकऱ्यांनी बँक खाते व आधार नंबर जमा करण्याचे आवाहन केले आहे.

अनुदानाची मदत वेळेवर हवी अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने खरिपात प्रचंड नुकसान झाले. उसनवारी घेतलेले पैसे देखील परत करता आले नाही. शासनाने मदत जाहीर करुन बराच कालावधी लोटला माञ अद्याप आम्हाला मदत मिळाली नसल्याने मोठा मनस्ताप होत आहे. शासनाकडून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग व्हावी अशी अपेक्षा आहे. - गणेश लोखंडे, शेतकरी, पारध

पुन्हा कागदपत्रे जमा करण्यास सांगितल्याने शेतकऱ्यांचा आणखी ताण वाढला अगोदरच अतिवृष्टीने घायाळ झालेले शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. त्यात आणखी शेतकऱ्यांची परेशानी वाढविण्याचे काम प्रशासनाकडुन करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.यापूर्वी महसुल खात्याकडे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकडून आधार व बँक खाते तसेच मोबाईल नंबर देण्यात आले असताना पुन्हा हेच कागदपत्रे दोन दिवसापासून शेतकऱ्यांना मागितले जात असल्याने शेतकऱ्यांचा आणखी ताण वाढला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना हे कागदपत्रे ग्रामपंचामध्ये जमा करण्याचा फतवा महसुल विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे महसुल व बँकेकडे शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा उपलब्ध असताना पुन्हा हा कागदपञांचा घाट कशासाठी असा प्रश्न पडत आहे.

बातम्या आणखी आहेत...