आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:67 पैकी 7 पीजी कोर्सेस हाऊसफुल्ल ,32 कोर्सला दहा पेक्षाही कमी प्रवेश; १० सप्टेंबरला अखेरची संधी

डॉ. शेखर मगर|औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पदव्युत्तर पदवीचे स्पॉट अॅडमिशन अवघ्या दोन दिवसांवर (१० सप्टेंबर) येऊन ठेपले आहे. यापूर्वी झालेल्या सर्व प्रवेश फेऱ्यांतील चारही विद्याशाखेत फक्त ४७ टक्के प्रवेश झाले आहेत. म्हणजेच अद्याप ५७ टक्के जागा रिक्त आहेत. ६७ पैकी फक्त ७ पीजी कोर्सेस हाऊसफुल्ल झाले आहेत, तर तब्बल ३२ कोर्सेसला १० पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत.

विद्यापीठाने पदवी निकाल ६ ऑगस्टला जाहीर केले होते. त्यानंतर ८ ऑगस्टपासून ऑनलाइन नोंदणीला सुरूवात झाली. छाननीनंतर प्रत्यक्षात १ सप्टेंबरपासून नाट्यगृहात प्रवेशोत्सवाला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ३६ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला. ७३४ पैकी ६०० जणांनी म्हणजेच ८१ टक्के जणांनी प्रवेश निश्चित केले आहेत. विज्ञानच्या १३४ जागा रिक्त असून त्याचे प्रमाण १९ टक्के आहे. आंतरविद्याशाखीय अभ्यास, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र आणि मानव्य विद्याशाखेची ५ सप्टेंबरला प्रवेश प्रक्रिया आटोपली. तिन्ही विद्याशाखांतील बहुतांश अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची वानवा असल्याचे दिसून आले.

मानव्यच्या १७ अभ्यासक्रमांच्या ९९० जागा असून फक्त ३४० प्रवेश झाले आहेत. पण त्याचे प्रमाण फक्त ३४.३४ टक्के आहे. या विद्याशाखेत ६५.६६ जागा अद्यापही रिक्त आहेत. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र शाखेतील ३ कोर्सेसच्या २४० जागा असून फक्त ३३ प्रवेश झाले आहेत. १३.७५ टक्के प्रवेश झाले आहेत. तब्बल ८६.२५ टक्के जागा १० सप्टेंबरला भरण्याचे आवाहन या विद्याशाखेसमोर आहे. आंतरविद्याशाखेत ११ अभ्यासक्रमांची २९७ प्रवेश क्षमता आहे. या शाखेत १४६ प्रवेश झाले असून त्याची टक्केवारी ४९.१५ असून ५०.८५ टक्के जागा रिक्त आहेत.

एमए (समाजशास्त्र), एमएसडब्ल्यूसाठी एकही जागा शिल्लक नाही
एम. ए. समाजशास्त्रची क्षमता ४० असून सर्व जागांवर प्रवेश झाले आहेत. सामाजिक कार्य म्हणजेच एमएसडब्ल्यू ६० पैकी ६० प्रवेश झाले आहेत. एमएस्सी रसायानशास्त्रचे ७० पैकी ७०, तर एमएस्सी अॅनालिटिकल केमिस्ट्रीचे १७ पैकी १७ प्रवेश झाले आहेत. संगणक व माहिती तंत्रज्ञानशास्त्र विभागातील सर्व कोर्सला विद्यार्थ्यांनी भरभरून पसंती दिली आहे. एमएस्सी (संगणकशास्त्र) ३२ पैकी ३२ तर विनाअनुदानित एमएस्सी संगणकशास्त्रचे ८ पैकी ८ जागांवर प्रवेश झाले. एमएस्सी माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्याही ३२ पैकी ३२ जागा भरल्या.

पर्यटनशास्त्रला फक्त १२ प्रवेश
एमकॉमच्या ७० पैकी २४ जागा भरल्या आहेत. एमआयबी अर्थात मास्टर ऑफ इंटरनॅशनल बिझनेसच्या कोर्सला ७० पैकी फक्त ३ जणांनी प्रवेश घेतले आहेत. मास्टर ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंटच्या ३० जागांपैकी फक्त १२ जागांवर प्रवेश झाले आहेत. हिंदी-४, मराठी-७, लोकप्रशासनशास्त्र-७, तर संस्कृतच्या फक्त ३ जागांवर प्रवेश झाले आहेत. ९ प्रवेश झालेले २ विभाग, ८ प्रवेश झालेला १, तर ५ प्रवेश झालेले ४ विभाग आहेत.

बातम्या आणखी आहेत...