आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदाचा शिधा:99 टक्के लाभार्थींना मिळाला आनंदाचा शिधा : पुरवठा विभाग

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीपूर्वी १०० रुपयांत चार शिधावस्तू वाटपाच्या निर्णयाची अंमलबजावणी संथगतीने झाल्याने ६० टक्के लोकांना सणापूर्वी शिधा मिळाला, तर उर्वरित ४० टक्के लोकांना १५ दिवस प्रतीक्षा करावी लागली. यातही काहींना एक-दोन वस्तू मिळाल्या, तर काहींना काहीच नाही. दरम्यान, ९ नोव्हेंबरपर्यंत ९९.८६ टक्के लाभार्थींना आनंदाचा िशधा वाटपाचा दावा पुरवठा विभागाकडून करण्यात आला असून यात चारही वस्तूंचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४ ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषणेप्रमाणे जालना जिल्ह्यात एकूण ३ लाख ५४ हजार ९०४ शिधापत्रिकाधारकांना दिवाळीला आनंदाचा शिधा वाटपाचे उद्दिष्ट होते. मात्र, निर्णयापासून ते अंमलबजावणीपर्यंत तीन आठवड्यांचा कालावधी असल्यामुळे निविदा मागवणे, पुरवठादार नेमणे, कार्यारंभ आदेश देणे व प्रत्यक्ष रेशन दुकानदारांपर्यंत शिधावस्तू पोहोचवून त्या लाभार्थींना प्रत्यक्ष वाटप करण्यापर्यंतची कसरत प्रशासकीय यंत्रणेला करावी लागली. वस्तू सुट्या नव्हे, तर पॅकिंग करून द्यावयाच्या होत्या, त्यावर शासनकर्त्यांचे फोटोही चिकटवायचे होते, त्यामुळे यात बराच वेळ गेला व शेवटच्या टप्प्यात एकाच वेळी वाहतूक करण्याचे मोठे आव्हान होते. याचाच परिणाम म्हणून दिवाळीपूर्वी ५५ ते ६० टक्के शिधावस्तूंचे वितरण झाले व उर्वरित वस्तूंचे वाटप करण्यासाठी तब्बल ९-१० नोव्हेंबर उजाडला.

लाभार्थी व वितरित शिधावस्तू अशा
अंत्योदय योजनेचे ४३ हजार ४११, प्राधान्य कुटुंबाचे २ लाख ८१ हजार ५८१, तर शेतकरी शिधापत्रक २९ हजार ९१० अशा एकूण ३ लाख ५४ हजार ९०२ लाभार्थींना शिधावस्तू वितरित करण्यात आल्या. यात रवा, साखर, चणा डाळ व पामतेलाचा समावेश असून सर्व वस्तू समान मिळाल्या असून फक्त पामतेलाची तीन पाकिटे कमी आली.

बातम्या आणखी आहेत...