आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात अव्वल:बंगळुरूमधील निम्हान्सच्या धर्तीवर कुंबेफळ शिवारात होणार 365 खाटांचे मनोरुग्णालय; सार्वजनिक बांधकाम विभागाचा संकल्प

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेसच्या धर्तीवर जालना तालुक्यातील कुंबेफळ शिवारात सहा हेक्टरवर प्रादेशिक मनोरुग्णालय साकारले जाणार आहे. ३६५ खाटांच्या या मनोरुग्णालयासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठाेड यांच्या आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सकांना जमीन प्रदान करण्यात आली आहे. इमारत व निवासस्थान बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी मुख्य अभियंता (प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम, औरंगाबाद) यांच्याकडे पाठवण्यात आला. याला मंजुरी मिळताच टेंडर, कंत्राटदार निवड व कार्यारंभ आदेश देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ५ ऑक्टोबर २०२१ रोजी या जालन्यात मनोरुग्णालयात मान्यता मिळालेली आहे. जिल्हा रुग्णालयालगतची मोकळी जागा प्रस्तावित करण्यात आली. मात्र ही जागा अपुरी असल्यामुळे शहराबाहेरील जागेचा शोध सुरू झाला. यासाठी जालन्याचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडून शासकीय जमीन जागा उपलब्ध असल्याची माहिती मागवण्यात आली. यात कुंबेफळ शिवारात मुबलक जमीन उपलब्ध असल्यामुळे स्थळपाहणी करून सहा हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. कुंबेफळ ग्रामपंचायतीकडून जमीन देण्यास काही हरकत नाही असा ठराव ग्रामसभेत पास करण्यात आला. यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय यासाठी जमीन देण्याची शिफारस केली. तर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सहा हेक्टर जमीन जिल्हा शल्यचिकित्सक यांना प्रदान केली.

काही बाबी अंदाजपत्रकात समाविष्ट : बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेसची क्षमता १ हजार खाटांची असून या ठिकाणी मानसोपचारांबरोबरच विविध प्रकारचे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. अशा या अत्याधुनिक संस्थेच्या इमारतीची पाहणी करून आल्यावर आरोग्य व बांधकाम विभागाच्या तज्ज्ञांनी काही बाबी अंदाजपत्रकात समाविष्ट केल्या आहेत.

दीडशे कोटींहून अधिक खर्चाचाच प्रकल्प
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारतीसाठी ५८ कोटी तर निवासस्थान बांधकामासाठी ९४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्याचे केबिन व त्यांची सुरक्षितता यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे.

देशात मॉडेल बनवण्याचा मानस
बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस तसेच ठाणे, नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाची तज्ज्ञांमार्फत पाहणी करण्यात आली असून असून त्या ठिकाणी असलेल्या अद्ययावत सोयी-सुविधा याचा विचार करूनच अंदाजपत्रक करण्यात आले आहे. तसेच वेळोवेळी झालेल्या बैठकीत सुचवलेले बदलही यात अंतर्भूत करण्यात आले आहेत. तसेच पुणे येथील वास्तुविशारद यांचीही मदत घेण्यात आली आहे. यामुळे देशातील अव्वल दर्जाचे प्रादेशिक मनोरुग्णालय जालन्यात उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रयत्न असल्याचे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राहुल पाटील यांनी सांगितले.

भूमिपूजनासह प्रत्यक्ष कामाचा मुहूर्तही लांबणीवर
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्र दिन १ मे २०२२ रोजी जालना तालुक्यातील इंदेवाडी येथे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्याचे ठरवले होते, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश १९ मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले होते. मात्र, वेळेत कागदोपत्री कार्यवाही पूर्ण न झाल्यामुळे अखेर १ मेचा भूमिपूजनाचा मुहूर्त हुकला, एवढेच नाही तर १ जूनपर्यंतसुद्धा ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. यामुळे इमारतीच्या भूमिपूजनासह प्रत्यक्ष कामाचा मुहूर्तही लांबणीवर पडला आहे. मात्र प्रादेशिक मनोरुग्णालय हा अत्यंत वेगळा विषय असल्यामुळे विविध विभागांची मदत यासाठी घ्यावी लागत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या विविध परवानग्या यासाठी आवश्यक असतात. तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात बराच वेळ जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

तांत्रिक मंजुरीनंतरच आता टेंडर काढू
जालन्यात मंजूर असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारत बांधकामाचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी औरंगाबादेतील मुख्य अभियंता कार्यालयास पाठवलेला आहे. याला मंजूरी मिळताच टेंडर काढणे, कंत्राटदार नेमणे, कार्यारंभ व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकेल.
राहुल पाटील, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जालना

बातम्या आणखी आहेत...