आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:धार्मिक स्थळांच्या जनजागृतीसाठी गुजरातच्या 60 वर्षीय दांपत्याचे दुचाकीवरून भारतभ्रमण

जालना2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील जामनगर येथील ६० वर्षीय बकुलेशचंद्र गोपालदासजी निंबार्क (वैष्णव) आणि त्यांच्या पत्नी कामाक्षीदेवी हे ६ ऑक्टोबर २०२१ पासून दुचाकीवरून भारत भ्रमणावर निघाले आहेत. भारतीय धार्मिक स्थळांची जनजागृती करत पर्यटनस्थळांना भेटी देणे व धार्मिक स्थळांना भेटी देऊन भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक कथा जोपासण्याचा संदेश देत आहेत. हे दांपत्य रविवारी जालन्यात पोहोचल्यानंतर वैष्णव-बैरागी समाजबांधवांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. कुंभार गल्लीत हा स्वागत समारंभ पार पडला. या वेळी वैष्णव समाजाचे अध्यक्ष कैलासदास वैष्णव, बैरागी समाज अध्यक्ष ओमप्रकाशदास वैष्णव, पुरुषोत्तमदास वैष्णव, चरण महाराज वैष्णव, सुरेशदास वैष्णव, मनोजदास वैष्णव, रवींद्रदास बैरागी, राजेंद्रदास वैष्णव, रामप्रसाद बैरागी, विजयदास वैष्णव, कैलासदास वैष्णव, मानसदास वैष्णव, ममता कैलाशदास वैष्णव, हर्ष पंकजदास वैष्णव, पूजा निखिलदास वैष्णव, ऊर्मिला राजेंद्रदास वैष्णव, सारिका रवींद्रदास वैष्णव आणि समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बकुलेशचंद्र निंबार्क हे भारतीय सैन्य दलात जवान म्हणून कार्यरत होते. तेथून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते गुजरात प्रशासनात कार्यालयीन अधीक्षक म्हणून रुजू झाले होते. निवृत्त झाल्यानंतर पुढील आयुष्य धार्मिक जनजागृतीसाठी खर्च करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि पत्नी कामाक्षीदेवी (५६) यांना सोबत घेऊन भारतीय संस्कृतीतील धार्मिक स्थळांच्या प्रचार आणि प्रसारासाठी दुचाकीवरून भारत भ्रमणावर निघाले आहेत. आतापर्यंत त्यांनी पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांत भ्रमण केले असून सध्या ते महाराष्ट्र भ्रमणावर आहेत. येथून ते मध्य प्रदेशकडे रवाना होणार आहेत. देशातील एकूण ५२ पैकी २६ द्वारपीठांना भेटी दिल्या आहेत. विशेष म्हणजे रस्त्याने ते कुणाच्याही घरी थांबत नाहीत, फक्त धर्मशाळेत थांबतात.

स्वतः स्वयंपाक करून भोजन करतात. कोठे समाजबांधव असतील तर त्यांच्याकडे जेवण करतात. जेवण बनवण्याचे साहित्यही त्यांच्याकडे आहे. प्रत्येकामध्ये धार्मिक वृत्ती वाढावी, प्रत्येकाने आपापल्या धार्मिक स्थळांना भेटी द्याव्यात, सर्व शक्तिपीठाला जावे, कोणतेही धार्मिक स्थळ अर्धवट करू नये. जसे- अष्टविनायक आहेत. त्या पूर्ण गणपती स्थळांना जावे, पूर्ण चार धाम करावेत तरच धार्मिक यात्रेचे फळ लाभते असे ते सांगतात. आतापर्यंत भारताच्या दक्षिण आणि पूर्व भागात भ्रमण केलेले असून उत्तर भागात भ्रमण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दररोज आपण २००-२५० किलोमीटर प्रवास करीत असल्याचे सांगत भारतीय संस्कृतीची जोपासना झाली पाहिजे असा संदेश दिला.

बातम्या आणखी आहेत...