आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:तरुणाई देणार प्रस्थापितांना हादरा; निवडणूक लढवण्यास इच्छुक रांगेत

भोकरदन11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून गावागावांतील इच्छुक तरुणांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पारंपरिक अशिक्षित (फक्त सहीचा अधिकार असलेला) खांद्यावर हात ठेवून गावागावात सत्ता स्थापन करणाऱ्या सह्याजीरावांचे अस्तित्व आता संपुष्टात येण्याची चिन्हे गावपातळीवर दिसू लागली आहेत. परंतु, मतदार तरुणांना पसंती देणार की, प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या आमिषाला बळी पडणार? हे १८ डिसेंबरच्या आखाड्यानंतरच समजणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीला परवानगी दिल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक पुढील महिन्यात पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम पार पडणार असल्याने या निवडीकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच गावागावांत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भोकरदन तालुक्यातील ३२ ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. त्यासाठी २८ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.

त्यामुळे उच्चशिक्षित तरुण इच्छुकांनी जुन्या प्रस्थापितांच्या विरोधात रणशिंग फुंकत निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता नवा पर्याय पाहिजे, असे म्हणत गावागावांतील तरुणाईचा सुशिक्षित उमेदवारांकडे कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या तरुणांकडून इच्छुक उमेदवारांनी नागरिकांसह गावनेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय हा यापूर्वीच घेण्यात आलेला होता. परंतु, महाविकास आघाडी सरकारने या निर्णयास स्थगिती देऊन सरपंचाची निवड ही सदस्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. त्यांनी सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे. त्यानुसार सरपंचपदाची निवडणूक थेट पद्धतीने होणार आहे. त्यामुळे गावागावांत गावकी-भावकीच्या राजकारणाला वेग येणार आहे.

गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साहत मात्र बघायला मिळत आहे. तालुक्यातील ५० टक्के ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच आहेत. काही ठिकाणी महिला जरी सरपंच असल्या तरी तिचा पतीच कारभारी असल्याचे दृश्य मागील पंचवार्षिकमध्ये बघायला मिळाले. यामुळे या वर्षी चित्र बदलेल की नाही संभ्रम आहे.

उच्चशिक्षित उतरणार रिंगणात?
आता जनतेमधून सरपंच निवड होणार असल्यामुळे गावागावांत मोठी चुरस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक उच्चशिक्षित तरुणही निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटांकडून पॅनल जुळवणीची तयारी सुरू झाली आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा आता मतदारांसमोर मांडावा लागणार आहे. परिणामी प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत.

गावागावांत होऊ दे चर्चा
सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर पॅनलप्रमुखांकडून उमेदवार जुळवाजुळवीसाठी राजकीय कसरत सुरू झाली आहे. आगामी मोर्चेबांधणीसाठी गावातील जाणत्या नेत्यांनी तरुणांना साद घालत निवडणुकीच्या तयारीला लागा, अशी भावनिक साद घातली आहे. त्यामुळे गावागावांतील पारावर चर्चेला उधाण आले आहे.

बातम्या आणखी आहेत...