आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई ते नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे गत तीन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले असून यावरून रहदारी सुरू झाली आहे. आता या महामार्गाला जोडून जालना ते नांदेड असा एकूण १७९.८ किमी लांबीचा नवीन एक्स्प्रेस वे होत असून प्रस्तावित मार्गाची पाहणी, माेजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आता दरनिश्चिती, मूल्यांकन, शेतकऱ्यांना मावेजा अदा करत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे राजधानी मुुंबई व उपराजधानी नागपूरनंतर दक्षिण भारताशी जालना जोडले जाणार आहे. शिवाय नांदेडपासून पुढे हैदराबादपर्यंत एक्स्प्रेस वेचा प्रस्तावही विचाराधीन असल्यामुळे जालन्याच्या वैभवात आणखी वाढ होणार आहे.
जालना जिल्ह्यातील स्थिती
जालना, परतूर, मंठा तालुक्यातील अनुक्रमे १६, ३ व १० अशा एकूण २९ गावांतून हा महामार्ग जात असून यासाठी ६१८.९८ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यात नदी, नाले, रस्ते आदींसह ३५.८१ हेक्टर शासकीय, तर उर्वरित जमीन खासगी मालकीची अर्थात शेतकऱ्यांची असेल. यामुळे ६८६ गटातील १४१३ शेतकरी बाधित होणार आहेत.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
१७९.८ किमी लांबी असलेल्या या प्रकल्पात ३+३ लेन असून याची बांधणी आरसीसीची असणार आहे. या मार्गावर ७ मोठे पूल, तर रेल्वे ओलांडणीसाठी २ पूल, ८ ठिकाणी इंटरचेंज व १८ अंडरपास असणार आहे. यासाठी जवळपास २२०० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार असून यावर १४ हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
९०% शेतकऱ्यांच्या संमतीनंतरच निविदा
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा जो माेबदला मिळाला त्याच दरानुसार जालना-नांदेड या महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना मावेजा दिला जाणार आहे. सध्या डीपीआर बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच शेतकऱ्यांकडून संमतिपत्रे लिहून घेतली जाणार आहेत. ९० टक्के शेतकऱ्यांनी संमतिपत्रे भरून दिल्यावर निविदा काढली जाईल. - रामदास खलसे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, जालना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.