आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजाफराबाद तालुक्यातील सर्व जातीधर्मियांचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या वरुड बुद्रुक येथील अंबिका मातेच्या यात्रेस प्रारंभ झाला. रविवारी सकाळी देवीचे पूजन करून मुकुट चढविण्यात आला. त्यानंतर दुपारी चार वाजता मिरवणूकीत बारागाडे ओढण्यात आले. अंबा भवानी की जय या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला होता. शेकडो वर्षांपूर्वीची जुनी पारंपरिक परंपरा असलेल्या अंबिका मातेच्या उत्साहाला आजच्या आधुनिक युगातही मोठे महत्व असल्याचे चित्र आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात महाराष्ट्रभर ओळख असलेल्या वरुड बुद्रुक येथे मातेचे स्थान असून या मंदिरामध्ये पूर्वाभिमुख देवीची हिरवा शालू नेसलेली मूर्ती असून हजारो भाविक नवस फेडण्यासाठी हजेरी लावतात.
नवस बोलून पूर्ण व्हावा, यासाठी भाविक नवसाचे नारळ, धागा, रेशीम तसेच बांगड्याचा चुडा देवीच्या समोर दरवाजाला बांधून ठेवतात. नवस पूर्ण झाल्यास नारळ सोडून घेतात. यात्रेच्या दिवशी लहान बालकाला वाजत गाजत हळदी लावून सर्व अंगाला लिबांचा पाला गुंडाळून बारागाडे ओढण्यात येतात. तरूण मल्लखांब खेळण्यासह काठी फिरविणे आदी कवायती सादर करतात. तर ढोलताशाचा गजरात ठेकाही धरतात. यात्रेच्या दिवशी रात्री ९ वा. स्व. नानासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पारंपरिक सोंगाचा कार्यक्रम होतो.
यात नंदी, रामलिला, म्हैशासूर, लवकुश, रावणाचे सैन्य, फावडाफावडी ही सोंगे आकर्षक मानली जातात. तर दुसऱ्या दिवशी एकनाथ षष्टीला सकाळी ६ वाजता मातेचे सोंग निघते. सोगांची प्रथा ही घायवट घराण्यात असल्याने विठोबा घायवट यांच्या अंगात अंविका मातेची स्वारी येवून सोंग काढण्यात येते. दरम्यान, पुजारी विठोबा घायवट यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते राजु चिडे यासह मित्र परिवारानी सोशल मीडियावर जनजागृती करुन लोकवर्गणीतून टिनशेड तयार करण्यात येऊन मंदिराचे रंगरंगोटीने सुशोभिकरण केले आहे. यामध्ये मंदिर परिसरात खडीकरण करुन सिमेंट गट्टू बसविण्यात आले आहे. वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.