आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपावसातही जल्लोष:रेकार्डब्रेक 13 तासांची भव्य मिरवणूक; 25 तास चालले गणेशमूर्तींचे विसर्जन

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या सावटानंतर यंदा प्रथमच निर्बंधमुक्त उत्सवामुळे जालनेकरांनी दोन वर्षांची कसर भरून काढत भक्तिमय वातावरणात, जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला. शुक्रवारी विसर्जन मिरवणुकीतही हाच जल्लोष कायम असल्याने विसर्जन मिरवणूक तब्बल १३ तास सुरू होती. शुक्रवारी सकाळी ८ वाजता मोती तलावावर मूर्ती विसर्जन सुरू झाले ते शनिवारी सकाळी ९.१५ वाजेपर्यंत सुरू होते.

घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी मोती तलाव परिसरात दोन कृत्रिम हौद उभारण्यात आले होते. मंडळांच्या मोठ्या मूर्तींचे विसर्जनासाठी तलावाच्या ईशान्य बाजूस बॅरिकेड्स उभारून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्यात आले होते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह सेवाभावी संस्थांच्या स्वयंसेवकांनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनासाठी सहकार्य केले. याच ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. दिवसभरात जवळपास ३३ हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. गणेश महासंघाच्या वतीने मामा चौकात सार्वजनिक मिरवणुकीत सहभागी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी स्टेज उभारण्यात आले होते.

रात्री नऊ वाजेच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल, गणेश फेस्टिव्हलचे अध्यक्ष भास्कर दानवे, राजेश राऊत, अशोक पांगारकर आदींची उपस्थिती होती. गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मानाच्या गणपतीच्या पदाधिकाऱ्यांचे भेटा बांधून स्वागत केले. मिरवणुकीत सर्वात पुढे पारंपरिक मंगलवाद्य व सनई-चौघडा, त्यानंतर डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, गणेशमूर्ती या पद्धतीने मंडळांनी सहभाग घेतला. मामा चौक, सावरकर चौक, दाना बाजार, शौला चौक, बडी सडक, राम मंदिर, सराफा बाजार, पाणीवेस, सुभाष चौक, मस्तगड या मार्गाने सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती मोती तलाव परिसरात पोहोचल्या. या ठिकाणी मोठ्या मूर्ती क्रेनच्या साहाय्याने तर छोट्या मूर्ती तराफ्याच्या साहाय्याने स्वयंसेवकांनी विसर्जित केल्या.

संपूर्ण तलावाला बॅरिकेड्स
शहरातील मुख्य विसर्जन स्थळ असलेल्या मोती तलावावर या वेळेस प्रथमच प्रचंड सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून मुख्य रस्त्याच्या कडेला संपूर्ण तलावाला बॅरिकेड्स लावण्यात आले होते. घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी येणाऱ्यांनाही तलावाच्या भिंतीपर्यंत जाऊ देण्यात आले नाही. सार्वजनिक मंडळाचा एकच पदाधिकारी तलावापर्यंत सोडण्यात येत होता. तेथून क्रेनच्या साहाय्याने मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते.

मिरवणुकीवर करडी नजर
विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे आणि अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख स्वतः संपूर्ण शहरभर फिरून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

बातम्या आणखी आहेत...