आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायी दिंडीने:श्रीक्षेत्र साडेगाव येथील ग्रामस्थ पायी दिंडीने जांबसमर्थ येथे दाखल

तीर्थपुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील मंदिरातील मूर्तींच्या चोरीला दहा ते बारा दिवसांचा कालावधी उलटला असतानासुद्धा पोलिसांना तपासात कुठलाच पुरावा हाती लागला नाही. पोलिस प्रशासनावर आमचा विश्वास आहे, परंतु तपास यंत्रणेतला अजून गती येणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन साडेगाव येथील श्रीराम मंदिराचे मठाधिपती सुरेश महाराज रामदासी यांनी श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथे केले. श्रीक्षेत्र साडेगाव ते श्रीक्षेत्र जांबसमर्थ पायी दिंडीचे गुरुवारी साडेगाव ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

मूर्ती चोरीच्या घटनेचा निषेध म्हणून घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र साडेगाव (समर्थ रामदास स्वामी स्थापित मठ) ते श्रीक्षेत्र जाबसमर्थ पायी दिंडीचे काढण्यात आली. सकाळी सहा वाजता साडेगावहून जांबकडे मार्गस्थ झालेली दिंडी सायंकाळी सहा वाजता जांब गावी पोहोचली. यावेळी साडेगाव येथील श्रीराम मंदिराचे मठाधिपती सुरेश महाराज रामदासी, अंकुशराव बोबडे, पांडूरंग महाराज आनंदे, सरपंच बाळासाहेब तांगडे, माजी सरपंच बाबासाहेब तांगडे, बालासाहेब महाराज शास्त्री यांची उपस्थिती होती. सदरील दिंडी साडेगावहून श्रीकृष्ण नगर, तीर्थपुरी, खालापुरी, खडका, लिंबोनी, कुंभार पिंपळगावमार्गे जांबेत दाखल झाली. समर्थांनी ११०० मठांची स्थापना भारतभर केली आहे. त्यातीलच एक साडेगाव येथील समर्थ स्थापित रामदासी मठ होय. यावेळी बोलतांना सुरेश महाराज रामदासी म्हणाले की, साडेगाव आणि जांबच अतूट संबंध असून हे नाते समर्थ रामदास स्वामींनी जोडले आहे.

त्यामुळे आमचे जांब गावाविषयी कायमच ऋणानुबंध राहिलेले आहेत. मूर्ती चोर कोण आहेत हे आम्हाला माहीत नाही परंतू आम्हाला आमच्या चोरीला गेलेल्या मूर्ती त्वरित मिळाव्यात यासाठी पोलिस प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. तसेच श्रीराम प्रभूंना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला होता. तसेच चौदा दिवसांचा वनवास भोगून श्रीराम प्रभू नक्कीच पून्हा जांबेत येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पोलिस प्रशासनावर आमचा विश्वास असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बारा दिवसांचा कालावधी उलटूनही मूर्तींचा तपास ‘जैसे थे’च
घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या देवघरातील श्रीरामचंद्र, सीतामाता, लक्ष्मणासह अन्य सहा मूर्तींची चोरी होऊन बारा दिवसांचा कालावधी उलटला असून पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. आजपर्यंत जांबसमर्थ येथील ग्रामस्थांनी विविध प्रकारची आंदोलने करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. परंतु त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट तपासात अजून दिरंगाई होत असल्याचे गावकऱ्यांमधून बोलले जात आहे. आ.राजेश टोपे यांनीसुद्धा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडला होता.

बातम्या आणखी आहेत...