आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध शासकीय विभागांनी अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिले. अनुकंपा नियुक्तीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह सर्व विभागप्रमुख बैठकीस उपस्थित होते. विविध विभागात गट-क व गट-ड संवर्गातील अनुकंपा नियुक्तीची अनेक प्रकरणे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित राहत असल्यामुळे अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करणे व त्यानुसार सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या २० टक्के पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने विभागप्रमुखांनी कोणती कार्यवाही केली व चालू वर्षात अनुकंपा नियुक्तीने किती पदे भरली आहेत.
याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्याचबरोबर मागील सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षात किती पदे रिक्त झाली व अनुकंपा तत्त्वावर किती पदे भरण्यात आली आहेत, याचाही आढावा घेतला. अनुकंपा नियुक्तीबाबत निर्देश देताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, अनुकंपा उमेदवारांचे नाव आपल्या कार्यालयाच्या प्रतीक्षा सूचीवर समाविष्ट केल्यास, त्याच तारखेस विलंब न करता सदर परिपूर्ण प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाच्या २१ सप्टेंबर २०१७ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हास्तरीय सामायिक यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. तसेच सामायिक यादीतील समाविष्ट असलेल्या अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती दिल्यास संबधितांचे नाव सामायिक यादीतून वगळण्यासाठी पत्राव्दारे तातडीने कळवावे.
दोन उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्तिपत्र : सरळसेवा कोट्यातील रिक्त होणाऱ्या पदांच्या २० टक्के पदे ही अनुकंपा तत्त्वावर भरण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी अनुकंपा तत्त्वावर दोन उमेदवारांना तलाठी या पदावर ३ जुन रोजी नियुक्तिपत्र देत प्रामाणिकपणे व सचोटीने काम करण्याची सूचना केली.
तहसील कार्यालय, भोकरदन येथे तलाठी या पदावर कार्यरत असलेले सुभाषसिंग सुखलाल राजपूत यांचे कर्तव्यावर असताना निधन झाले होते. त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा चेतन सुभाषसिंग राजपूत यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय, भोकरदन येथे तलाठी पदावर तर तहसील कार्यालय, अंबड येथे कर्तव्यावर असताना निधन झालेले नवनाथ पुंडलिकराव गायकवाड यांचा मुलगा तुषार नवनाथ गायकवाड यांची उपविभागीय कार्यालय, अंबड येथे तलाठी पदावर नियुक्ती केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.