आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:बांधकामाचा ठेका घेऊन परत येताना बाप-लेकांसह तिघांचा अपघाती मृत्यू ; दोन दुचाकींची धडक

पहूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे बुधवारी रात्री दोन दुचाकींच्या समोरा-समोर झालेल्या धडकेत बाप-लेकासह तीन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती. यातील मृतांवर गुरुवारी सकाळी शोकाकूल वातावरणात देऊळगाव गुजरी व थळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. देऊळगाव गुजरी येथील प्रवीण नामदेव माळी (वय ४५) व त्यांचा मुलगा अतुल प्रवीण माळी (वय १७) हे दोघे बुलडाणा येथून सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विना क्रमांकाच्या बॉक्सर दुचाकीने बांधकामाचा ठेका घेऊन घरी परत येत होते. याचवेळी बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील थळ येथील विलास भगवान गव्हाळ (वय २८) व देऊळगाव गुजरी येथील खलील जमशेद तडवी हे दोघे दुचाकी (एमएच- २८, एक्यू- ६८२०)ने धामणगाव कडे जात होते. येथून जवळच असलेल्या लोकसभा ढाब्याजवळ दोघा दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. यात तीन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला. या चौघांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रवीण माळी, अतुल माळी व विलास गव्हाळ या तिघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तर खलील जमशेद तडवी यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मृत विलास गव्हाण यांचा भाऊ संजय भगवान गव्हाळ यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात मृत दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप चेडी करत आहेत. रात्रीच्यावेळी हा अपघात झाल्याने जखमींना रुग्णालयात हलवण्यास विलंब झाला. जखमींवर लवकर उपचार झाले असते तर काहींचा प्राण वाचू शकला असता, अशीही माहिती सूत्रांनी दिली. शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार : गुरुवारी सकाळी प्रवीण माळी आणि मुलगा अतुल माळी यांच्यावर देऊळगाव गुजरी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर विलास गव्हाळ यांच्यावर थळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...