आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:पोलिसांनी सोडून दिलेली महिला एलसीबीच्या चौकशीत निघाली खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी!

जालना2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • खुनाचा उलगडा पानशेंद्रा येथील महिलेचा खून करणाऱ्यांचा पोलिसांनी लावला अखेर तपासातून छडा

बदनापूर तालुक्यातील कंडारी-चिखली रोडवरील साखरवाडी शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात बदनापूर पोलिसांनी एका संशयित महिलेस आणून चौकशी केली. परंतु, यात काहीच आढळून आल्यामुळे पोलिसांनी ‘त्या’ महिलेला चौकशी करून सोडून दिले. परंतु, खुनात त्या महिलेचाच सहभाग असल्याचे ठोस पुरावे समोर आल्यानंतर पीआय सुभाष भुजंग यांनी त्या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेऊन खोलावर जाऊन प्रश्नांची सरबत्ती केली. उत्तरे देताना तिची बोबडी वळाली. खून कशामुळे केला, मृत महिलेला सोबत कोठून नेले, कसा गळा आवळला, चाकूचे वार कसे केले, हा घटनाक्रमच तिने सांगितला. यानंतर दुसऱ्या आरोपीस एलसीबी पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्ह्याची कबुली घेतली. या प्रकरणातून पोलिस ठाणे व एलसीबी तपास कसा प्रभावी असतो हे उघड झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातून समोर आले आहे.

८ मार्च रोजी सुमनबाई माणिक जिगे (६५, पानशेंद्रा, ता. जालना) या वृद्ध महिलेचा साखरवाडी शिवारातील कंडारी-चिखली रोडवरील गंगाधर मैनाजी रेगुडे यांच्या शेतात मृतदेह आढळून आला होता. कुणीतरी तिचा खून करून तो मृतदेह या शिवारात आणून टाकण्यात आला, अशा प्रकारची फिर्याद चंद्रकांत जिगे यांनी दिल्यावरून बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

बदनापूर पोलिसांनी संशयित आरोपी महिला रेखाबाई बाबूराव कोलपे (पानशेंद्रा) यांनी केला. या प्राथमिक माहितीनुसार त्यांनी त्या महिलेची चौकशी केली. परंतु, चौकशीअंती काहीच मिळाले नसल्यामुळे बदनापूर पोलिसांनी त्या महिलेला सोडून दिले. परंतु, या गुन्ह्यांवर स्थानिक गुन्हे शाखेकडूनही स्वतंत्र तपास सुरूच होता. गुन्ह्यात रेखाबाई हिचा सहभाग असल्याचे पुरावे एलसीबीकडे आले होते. यामुळे खून झाला त्या दिवशी आरोपी महिला तिच्या सोबतच होती. ही पुरेपूर माहिती असल्यामुळे पोलिसांनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. प्रत्येक प्रश्नाला त्या आरोपी महिलेने खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी प्रश्नांवर प्रश्न केले. खून तुम्ही केला नाही, परंतु, तुम्ही सोबत कशा होता, हे सर्व पुरावे सांगितल्याने अखेर त्या महिलेने कसा व कशासाठी हा खून केला याबाबत माहिती दिली. रेखाबाई कोलपे व भगवान विजयकुमार पाटील (३१, मोदीखाना, जालना) या दोघांनी हा खून केला आहे.

रेखाबाई हिच्या चारित्र्याबाबत गावात बदनामी केली म्हणून व तिच्याकडील हातउसने पैसे परत केले नसल्याकारणाने हा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही कारवाई एलसीबी पीआय सुभाष भुजंग, उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, कैलास चेके, योगेश सहाने, मंदा नाटकर, चंद्रकला शडमल्लू, रमेश पैठणे यांनी पार पाडली.

चनेगाव-चिखली-साखरवाडी शिवारात एकाने आवळला गळा, दुसऱ्याने खुपसला चाकू
राजूरला दर्शन घेतल्यानंतर महिलेला निर्मनुष्य ठिकाणी नेत केला त्या महिलेचा घात
आरोपी महिला रेखाबाई कोलपे हिने मृत सुमनबाई माणिक जिगे हीस घरावर कर्ज घ्यायचे आहे, तुम्ही जामीनदार व्हा, असे सांगून सोबत घेऊन जालना येथे आणले. या ठिकाणाहून आरोपी भगवान विजयकुमार पाटील याने दोघींना दुचाकीवरून राजूरला नेत दर्शन घेतले. त्या ठिकाणाहून अंगूर व इतर काही खाद्यपदार्थ घेतले. यानंतर चनेगाव-चिखली-साखरवाडी शिवारात जाऊन निर्मनुष्य ठिकाणी लिंबाच्या झाडाखाली नेण्यात आले. या ठिकाणी मृत महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतले. याचप्रसंगी रेखाबाई हिने सुमनबाई हिचा गळा आवळला, तर आरोपी भगवान पाटील याने चाकूचे पोटावर वार केले. यानंतर हे दोघेही त्या ठिकाणाहून फरार झाले.

आठ दिवसांपासून होता खुनाचा ‘प्लॅन’
महिलेचा खून करण्यासाठी दोघांचाही आठ दिवसांपासून प्लॅन होता. परंतु, योग्य संधी येत नव्हती. दरम्यान, ८ मार्च रोजी आरोपी महिलेने मृत महिलेस सोबत घेतले होते. आरोपी महिलेने खुनाच्या उद्देशाने घरूनच चाकू, गळा आवळण्यासाठी दोरी हे साहित्य पिशवीत घेतले होते.

बारकाव्यांवर लक्ष केंद्रित केल्याने खुनाचा गुन्हा उघड
खुनाच्या गुन्ह्यात अनेक बारकावे होते. संशयित आरोपी महिला उडवाउडवीची उत्तरे देत होती. हे तिघे कसे गेले, कोणत्या मार्गाने गेले, याबाबतची सर्व माहिती व पुरावे संकलित केले होते. परंतु, संशयित आरोपी महिला कबुली देताना टाळाटाळ करत होती. परंतु, सखोल चौकशीतून दोन्ही आरोपींनी शेवटी कबुली दिली. सुभाष भुजंग, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना.

बातम्या आणखी आहेत...