आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्रामस्थांच्या मनात नदीबाबत आत्मीयता निर्माण करावी

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने "चला जाणूया नदीला' या अभियानाखाली नदी संवाद यात्रेची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी सेवाग्राम वर्धा येथून झालेली आहे. याबाबत जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. तरी चला जाणूया नदीला हे अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व नागरिक व ग्रामस्थांच्या मनात आपल्या परिसरातून वाहणाऱ्या नदीबाबत आत्मियता निर्माण करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले.

चला जाणूया नदीला या उपक्रमाबाबतची आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, जिल्ह्यात "चला जाणूया नदीला' हे अभियान सध्या दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात गाव व शहर स्तरावर सुजान नागरिकांच्या समितीची स्थापना करावी व या उपक्रमाबाबतची गावकऱ्यांना माहिती होण्यासाठी विविध बैठका घेण्यात याव्यात.

या अभियानाची जनजागृती करण्यात यावी, नदीबाबत आपुलकी असणाऱ्या सर्व घटकांना या मध्ये सहभागी करून घेत नदी परिसरातील सर्व गावामध्ये हर घर नर्सरीचा संदेश देवून प्रत्येक घरी छोटीशी नर्सरी तयार करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यात यावे. पहिल्या सत्रात गावातील लोकांशी यात्रेचा उद्देश याबाबत चर्चा करावी तर दुसऱ्या सत्रात शिवार फेरी, प्रक्षेत्र भेटी देवून समन्वयकांनी अभ्यासपूर्णरित्या नदीबाबत नोंदी घ्याव्यात. नदीची पाठशाळा अंतर्गत स्थानिक पातळीवर नदीच्या समस्या आणि त्यावरील संभाव्य उपाय शोधावेत.

जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, समन्वयकांमार्फत तसेच लोकसहभागातून ‘’चला जाणूया नदीला’’ हे अभियान यशस्वी करावे. कृषी, वन विभाग, आत्मा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक संस्था आदिसह नागरिकांनी या अभियानात सक्रीय सहभाग घेवून नदीच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. अभियानाचा अहवाल जानेवारी महिन्यात प्रशासनास सादर केल्यानंतर तो शासनाकडे पाठविला जाईल, असे त्यांनी या वेळी सांगितले. या बैठकीस संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...