आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी हवालदिल:खरीपातील नुकसानीपाठोपाठ आता रब्बीत बदलत्या वातावरणाचा फटका

पिंपळगाव रेणुकाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी परतीच्या पावसाने उशिरापर्यंत जोरदार हजेरी लावल्याने खरीपात नुकसान सहन केलेल्या भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामातवर भिस्त होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. माञ अकरा ते सतरा डिसेंबरपर्यंत वातावरणात अचानक बदल झाला होता.याचा परिणाम रब्बीतील हरभरा व गहू पिकावार झाला असल्याने खरिपात नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना रब्बीतही फटका बसणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बुधवारी या परिसरात काही ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. सध्या बदलत्या वातावरणात मर व अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी औषधी फवारणी करीत अळीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी कृषी विभाग देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत तालुक्यात आतापर्यंत ४२ हजार ७१० हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. आणखी २७ हजार हेक्टर पेरणी होणार असल्याचा कृषी खात्याचा अंदाज आहे.

परतीच्या पाऊस तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून धुवाधार हजेरी लावत आहे.या पावसामुळे नदी, नाले, तलाव खळखळून वाहत आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वञ जलसाठा उपलब्ध आहे. विहिरी बोअरवेल तुडुंब भरले आहेत. खरिपात पिके ऐन काढणीला आली असता परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सोयाबीनसह कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा हतबल झाला. शेतकऱ्यांनी पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. माञ शेतकऱ्यांना अद्याप मदत भरपाई मिळाली नाही. आता शेतकऱ्यांची भिस्त पूर्णतः रब्बीवर आहे.

तालुक्यात पावसाने वार्षीक सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे सगळीकडे पाणी डबडब करीत आहे. यंदा रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनीदेखील खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन काढलेल्या क्षेत्रावर मका व जेथे सिंचनाची सोय आहे तेथे हरभरा व गहू पिकाची पेरणी केली आहे. हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजनुसार मागील काही दिवसापासून अचानक थंडी गायब होऊन वातावरणात बदल झाला. तसेच काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

खरिपात नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना रब्बीतदेखील बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे रब्बीतुन अपेक्षित उत्पादन मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा धुसर झाल्या आहेत. सध्या हरभरा व गहु पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकरी रोग आटोक्यात आणण्यासाठी महागडी औषधी फवारणी करीत आहे. ज्या ठिकाणी तीन फवारणी काम होईल अशा ठिकाणी शेतकऱ्यांना आता चार ते पाच फवारण्या हरभरा पिकावर कराव्या लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा नाहक खर्च वाढणार आहे.

शेतकऱ्यांनी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करावी
सलग चौथ्या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, मका या पिकाची पेरणी केलेली आहे. त्यामध्ये कीड नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असून हरभरा पिकामध्ये घाटी अळीचे नियंत्रणासाठी निमार्क अधिक एमामेक्तीन benzoate / क्विनाल्फोस/profenofos या कीडनाशकांची पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारणी घ्याव्यात. तसेच एकरी दोन कामगंध सापळे लावावेत किंवा एकरी बारा पक्षी थांबे पिकाच्या मध्ये लावावे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाचा सल्ला घ्यावा. कृषी खात्याकडूनदेखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी सांगितले.

साडेतीन एकर हरभरा पेरला
मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील साडेतीन एकरात डॉलर हरभरा पेरणी केली आहे. कमी खर्चात व कमी पाण्यात येणारे हे पीक आहे. शिवाय मेहनतदेखील कमी लागते. सध्या बदलत्या वातावरणाचा मोठा फटका हरभरा पिकावर बसला आहे. मर व अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने महागडी औषधी फवारणी सुरू आहे. - गजानन देशमुख, प्रगतीशील शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई

बातम्या आणखी आहेत...