आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपरिक पिकांना फाटा:पावसानंतर मिरची पिकाचे आणखी तीन हजार क्षेत्र वाढणार; भोकरदन तालुक्यात 2 हजार हेक्टरवर मान्सूनपूर्व मिरचीचे पीक बहरले..

पिंपळगाव रे.एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील विहिरीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतकऱ्यांनी आतापर्यंत दोन हजार हेक्टवर मान्सुन पुर्व मिरची लागवड केली आहे. सध्या हे पिक शेतकऱ्यांनी मेहनत घेतली असल्याने चांगलेच बहरले आहे. शिवाय पाऊस पडल्यानंतर मिरचीच्या क्षेञात आणखी तीन हजार हेक्टरने वाढ होणार असल्याचा कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. मागील दहा वर्षापासून शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत मिरची पिकाकडे वळला असल्याचे चिञ आहे.

तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, हसनाबाद, जळगाव सपकाळ, आन्वा, पारध, वालसांवगी, धावडा हिसोडा, कोठा कोळी, करजगांव, कल्याणी, आडगाव भोंबे, दहिगांव, धोंडखेडा, कोदा, लेहा, शेलुद, वडोद तांगडा, अवघडराव सांवगी आदी भागातील शेतकऱ्यांनी शेतात बेड तयार करुन त्यावर मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत दोन हजार हेक्टरवर मान्सुनपुर्व मिरचीची लागवड केली आहे. दरवर्षी शेतकरी मान्सूनपूर्व मिरचीची एप्रिल व मे महिन्यात लागवड करतो. यंदा देखील हा प्रयोग शेतकऱ्यांनी अंमलात आणला आहे.

यावर्षी माञ दरवर्षीच्या तुलनेत अधिक तापमान असल्याने अनेक शेतकऱ्यांचे लागवड केलेले मिरचीचे रोप उन्हाने जळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु शेतकऱ्यांनी पुन्हा त्या ठिकाणी दुसरे रोप आणत मिरची जगविण्यासाठी संघर्ष सुरू ठेवला आहे. कारण एप्रिल व मे महिन्यात लागवड केलेली मान्सूनपूर्व मिरची जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तोडणीला येते. या काळात बाजारपेठेत मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे जास्त भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने उन्हाळी मिरची लावण्यावर शेतकऱ्यांचा अधीकचा भर आहे.

मागील वर्षी जवळपास तीन ते साडे तीन हजार हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली होती. यंदा माञ यामध्ये दोन हजार हेक्टरने वाढ होणार आहे. सध्या शेत परिसरात शेतकरी रोज लागवड केलेल्या मिरची पिकाला ठिबकद्वारे पाणी देत मिरची जगविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे वन्यप्राण्यापासुन देखील मिरची उध्वस्त होण्याची भिती असल्याने शेतकरी रोज शेतात राञपाळी करीत आहेत. सध्या तालुक्यात दोन हजार हेक्टरवर मिरचीचे पिक चांगलेच बहरले आहे. दरम्यान शेतकरी दरवर्षी मिरची पिकातुन लाखोचे उत्पन्न घेत असल्याने शेतकऱ्यांची विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत होण्यास मदत होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सलग तीन वर्षांपासून परतीच्या पावसाचा आधार
भोकरदन तालुक्यात सलग तीन वर्षापासून मोसमी पावसासह परतीच्या पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीत दुपटीने वाढ झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरचीसाठी विहिरीतील पाणी राखीव ठेवले आहे. तालुक्यात दरवर्षी मार्च व एप्रिल महिन्यात पाणी टंचाई भेडसावते यंदा माञ परतीच्या पावसाने पाणी टंचाईला तुर्तास ब्रेक लागला असला तरी येणाऱ्या काळात पाऊस लांबला तर पाणी टंचाई निर्माण होण्याचे चिञ तालुक्यात दिसत आहे. सध्या तालुक्यात १४ गावातील नागरिकांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

एक एकर मिरचीची लागवड
मी गेल्या दोन वर्षापासुन मिरची पिकाची लागवड करतो व मागील वर्षी भाव सुध्दा चांगला मिळाल्याने दोन पैसे अधिक मिळाले. एप्रिल ते मे दरम्यान लागवड केलेल्या मिरची पिकाला जुन ते जुले दरम्यान सुरुवातीला चांगला भाव मिळत असल्याचे पिंपळगाव रेणुकाईचे शेतकरी मनोज देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...