आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मनिर्भर भारत अभियान:शेतकऱ्यांसाठी कृषी पायाभूत निधी योजना उपयुक्त, रोजगाराच्या संधी

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत राबविली जाणारी कृषी पायाभूत निधी योजना अत्यंत उपयुक्त असून याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत राबविली जाणारी कृषी पायाभूत निधी योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर प्रकल्प संचालक (आत्मा) शितल चव्हाण, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ शशीकांत पाटील, नाबार्डचे तेजल क्षीरसागर, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकचे तायडे, रेशीम विकास अधिकारी मोहिते, आत्माचे दत्तात्रय सूर्यवंशी, पीएमएफएमईचे शरद उंदरे आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी म्हणाले की, जालना जिल्हयाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी आणि कृषी उद्योगांवर आधारीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कृषीविषयक योजना जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यात येतात. आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत राबविली जाणारी कृषि पायाभूत निधी योजनेतंर्गत कापणी हंगामानंतरचे व्यवस्थापन, पायाभूत सोयी-सुविधा आणि सामुदायिक शेती मालमत्तांसाठी पूरक प्रकल्पांमध्ये गुंतवणुक करण्याकरीता मंजूर कर्जावरील व्याज अनुदान व आर्थिक सहायाव्दारे मध्यम-दीर्घ मुदतीसाठी कर्जपुरवठा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. या योजनेत कापणीनंतरच्या व्यवस्थापनासाठीचे प्रकल्प समाविष्ठ केलेले आहेत जसे ई- मार्केटिंग प्लॅटफॉर्म, गोदाम, पॅक हाऊस, मुरघास संकलन केंद्र, वर्गवारी आणि प्रतवारी गृह, शितगृह, पुरवठा सुविधा, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर आणि सामूहिक शेतीकरता आवश्यक इतर किफायतशीर प्रकल्प उदाहरणार्थ सेंद्रिय उत्पादने, जैविक निविष्ठा उत्पादन प्रकल्प, अचूक शेती व्यवस्थापनाकरता पायाभूत सुविधा, निर्यात समुहासहित समूहांना पायाभूत सुविधा निर्माण करणे. कार्यशाळेत शीतल चव्हाण यांनी पोकरा योजनेबाबत मार्गदर्शन केले.

अजय मोहिते यांनी रेशीम लागवड यावर मार्गदर्शन केले. शशिकांत पाटील यांनी कृषी उत्पादनावर आधारीत प्रक्रिया उद्योगांची सविस्तर माहिती दिली. तेजल क्षीरसागर यांनी कृषि पायाभूत निधी योजनेबाबत मार्गदर्शन केले. श्रीकांत देशपांडे यांनी स्मार्ट योजनेचे महत्त्व सांगितले. शरद उंदरे यांनी प्रधानमंत्री कृषी प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. श्री तावडे यांनी बँकेच्या योजना शेतकऱ्यांना सांगितल्या. दत्तात्रय सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी पायाभूत निधी योजनेच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. देशपांड यांनी आभार मानले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कृषि पायाभूत निधी योजनेतंर्गत प्राथमिक कृषी पत संस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संघटना, स्वयं सहायता गट, शेतकरी, संयुक्त दायित्व गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था, कृषी-उद्योजक, स्टार्टअप्स, एकत्रित पायाभूत सुविधा पुरविणारे केंद्र व राज्य संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प यांना कर्ज देण्यात येते, असे सांगून कृषी आणि कृषी प्रक्रिया आधारीत उपक्रमांना औपचारीक वित्त पुरवठा करणाऱ्या या योजनेमुळे जालना जिल्हयात रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...