आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावे, नसता भविष्यात त्यांना दुर्बिणीतून आपली शिवसेना शोधावी लागेल, असे विधान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते जालना येथे आयोजित हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात बोलत होते.
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहरात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खासदार हेमंत पाटील, शिवसेना उपनेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, विजय नाहटा, अभिमन्यू खोतकर, पंडितराव भुतेकर, भाऊसाहेब घुगे, बाबासाहेब इंगळे, ॲड.भास्कर मगरे, संतोष मोहिते, डॉ. आत्मानंद भक्त, फिरोज लाला तांबोळी,शैलेश घुमारे, माधवराव टकले, श्याम कदम, भगवान अंभोरे आदींची उपस्थिती होती.
उद्धव ठाकरेंनी चालवलेल्या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना रसातळाला चालली होती. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शैक्षणिक संस्था, शासकीय लाभाच्या योजना मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. तर पक्षासाठी राबत असलेल्या शिवसैनिकांना केवळ शिवभोजन थाळी दिली. शिवाय मंत्री, खासदार, आमदार यांना निधी दिलाच नाही. मात्र उद्धव ठाकरे वेळही देत नव्हते, असा आरोपही सत्तार यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून खरी शिवसेना वाचवली. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे देशाचे लक्ष लागले असून मुख्यमंत्र्यांची अपेक्षापूर्ती होईल, असा विश्वास कृषिमंत्री सत्तार यांनी व्यक्त केला.
आम्ही गद्दारी केली असती तर राऊत खासदार नसते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम्हाला आता गद्दार संबोधले जात आहे. पण आम्ही पक्ष वाचवण्याचेच काम केले आहे. आम्ही गद्दारी केली असती तर संजय राऊत हे राज्यसभेवर निवडून गेले नसते. त्यामुळे यापुढे टीका करताना विचार करायला हवा, असे नाव न घेता आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.