आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व सुद्धा केले. शिवाय अहिल्याबाई अशा शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत. पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला, एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता, पराक्रमी योद्धा, सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या व स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या आहिल्याबाई होळकर म्हणजे एक आदर्श लोक कल्याणकारी लोकमाता होय, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव तथा सरपंच राजेंद्र वांजुळे यांनी केले.
जालना तालुक्यातील चितळी पुतळी येथे जय मल्हार मित्र मंडळ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. वांजुळे म्हणाले, सर्वधर्मसमभावाचा आदर्श मिरवीत मंदिरे, मशिदी, दर्गे व विहार बांधली. तर काही मंदीरांचा जीर्णोद्धार केला. अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करत असताना आता खऱ्या अर्थाने नुसते चित्रापुरते न राहता त्यांचे चरित्र समजून घेणे महत्त्वाचे आहे.
त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे कार्य केले तर खर्या अर्थाने जयंतीचा उद्देश साध्य झाल्यासारखे होईल. तत्पूर्वी चितळी येथील जय मल्हार चौक नूतनीकरण व सुशोभीकरण करून वांजुळे यांच्या हस्ते चौकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर गावातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या मिरवणूकीत घोषणा देत नऊवारी साडी नेसून चिमुकल्यांनी लक्ष वेधून घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व मल्हार मित्र मंडळाने परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.