आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा संपूर्ण राज्यात निषेध व्यक्त केला जात आहे. यासंदर्भातच बुधवार, ७ डिसेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा व समविचारी पक्षाच्या वतीने जालना जिल्यात बंदची हाक देण्यात आली आहे, जिल्ह्यातील नागरिक व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंद यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बसपा, एम. आय. एम. शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी व विविध सामाजिक संघटनांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महापुरूषांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करावे तसेच त्यांची पाठराखण करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा व समविचारी पक्षाच्यावतीने ७ डिसेंबर रोजी जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
या बंदमध्ये सर्व व्यावसायिक, व्यापारी व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून बंद शांततेत पाळावा तसेच बंद यशस्वी करावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा कृती समिती तसेच आमदार कैलास गोरंट्याल, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी आमदार शिवाजीराव चोथे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी आमदार संतोष सांबरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र राऊत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, एम. आय. एम. तसेच सर्व संघटनांनी केले आहे.
जालना शहरात रॅलीचे आयोजन
जालना शहरात कडकडीत बंद पाळण्यात यावा यासाठी मराठा क्रांती मोर्चा व समविचारी पक्षाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघणार असून मराठा क्रांती मोर्चा कृती समिती व समविचारी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जालना ‘बंद'ला विविध संघटनांचा पाठिंबा जाहीर
७ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या जालना 'बंद' ला जालना शहरातील विविध व्यावसायिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यात जालना जिल्हा व्यापारी महासंघ, कापड असोसिएशन, हाॅटेल व बाल असोसिएशन, कापड मर्चंट असोसिएशन, रेडीमेड कापड असोसिएशन, कृषी व बियाणे विक्रेता असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक असोसिएशन, कटलरी साहित्य विक्रेता असोसिएशन आदींचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.