आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथेची सांगता:भगवंताच्या भेटीसाठी अनेक मार्ग असले तरी नामसंकीर्तन सोपा मार्ग

मंठा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवंत प्राप्तीचे अनेक मार्ग असले, तरी संतांनी येथील सर्वसामान्य भक्तांना अतिशय सोपा मार्ग सांगितला आहे. केवळ नामसंकीर्तनाच्या मार्गाने भगवंतापर्यंत आपण पोहोचू शकतो, असे प्रतिपादन गोवत्स राधाकृष्ण महाराज यांनी भागवत कथा निरुपणात बोलताना केले. सतीश महाराज जाधव यांच्या काल्याच्या किर्तनानंतर शनिवारी महाप्रसादाने भागवत कथा कीर्तन महोत्सवाची सांगता झाली.

येथील जगदंबा जिनिंग मैदानावर १३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान श्रीमद् भागवत कथा आणि कीर्तन महोत्सव भव्य स्वरूपात पार पडला. कथा प्रवक्ता गोवत्स राधाकृष्ण महाराज यांनी आपल्या कथा निरुपणातून बोलताना सांगितले की, वैष्णव संप्रदायाचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. त्यांनी आपल्याला नामसंकीर्तनाचा सोपा मार्ग दाखवला आहे. हाती टाळ आणि मुखामध्ये हरिनाम घेत लाखो वारकरी जेव्हा पायी चालत पंढरपूरला पोहचतात, तेव्हा त्यांच्या भेटीसाठी साक्षात पांडुरंग परमात्मा उभा असतो. देवाच्या महाद्वारात क्षणभर जरी उभे राहण्याचे भाग्य लाभले, तरी चारी मुक्ती साधल्या जातात असेही त्यांनी सांगितले. सात दिवस चाललेल्या या कथा सप्ताहात वामन अवतार, मत्स्य अवतार, नरसिंह अवतार, कृष्णजन्म, गजेंद्र मोक्ष, कंस वध आदी कथा त्यांनी आपल्या अमृतमय वाणीतून सांगितल्या.भागवत कथा ऐकल्याने जन्माचे कल्याण होते असेही त्यांनी सांगितले. कथेदरम्यान त्यांनी गायलेल्या विविध भजन आणि अभंगावर भाविकांनी ठेका धरला.

कथा श्रवणासाठी पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीय होती. कथा सप्ताह दरम्यान दररोज रात्री आठ ते दहा या वेळेत प्रकाश महाराज साठे, निवृत्ती महाराज इंदुरीकर, शिवा महाराज बावस्कर, संजय महाराज पाचपोर, समाधान महाराज शर्मा यांची सुश्राव्य कीर्तने झाली. किर्तन श्रवणासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कथा मंडपातील प्रत्येक श्रोता भक्ती आणि आनंदात न्हावून निघाला. सतीश महाराज जाधव यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर दुपारी महाप्रसाद झाला. दररोज होणाऱ्या अन्नछत्रासाठी शहरातील विविध व्यापारी असोसिएशनने योगदान दिले. कथेदरम्यान अनेक संत महंतांनी हजेरी लावली. यामध्ये नाशिक येथील दत्तधाम संस्थांचे दत्तदास महाराज, महामंडलेश्वर स्वामी कृष्ण चैतन्य महाराज, महंत भागवत गीरी तथा महंत बालक गिरी महाराज, सूर्यकांतेश्वर महाराज, सेवाधारी पौळ बाबा, रामकिसन महाराज यांच्यासह आदींचा समावेश होता.

दररोज होणाऱ्या महाआरतीसाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, खा. संजय जाधव, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, ए. जे. पाटील बोराडे, अॅड. पंकज बोराडे, कपिल आकात, गोपाळराव बोराडे, नगराध्यक्षा मीराताई बोराडे, सभापती संदीप गोरे, संचालक सतीशराव निर्वळ, संतोष वरकड, अजय अवचार, नितीन जेथलिया, पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, राजेश मोरे, प्रल्हाद बोराडे यांच्यासह अनेकांनी उपस्थिती दर्शवली. कथेच्या यशस्वीतेसाठी कथा यजमान दत्तप्रसाद सागर झंवर आणि आयोजक रामकृष्ण हरी प्रभात फेरी मंडळासह विविध समित्याच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. भागवत कथा तथा कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मोलाचे सहकार्य आणि सेवा दिली, त्यांचा गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

रामनाम प्रभातफेरीचे जागोजागी स्वागत
कथा सप्ताहाच्या दरदरम्यान दररोज शहरातील विविध भागातून राधाकृष्ण महाराज यांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये महिलांनी सडा, रांगोळ्या, गुढ्या उभारून, पुष्प वर्षाव करून पायघड्या घालून तसेच दिप लावून प्रभात फेरीचे स्वागत केले. फेरी दरम्यान अनेकांनी ठीक ठिकाणी महाराजांचे स्वागत केले. मागील आठ वर्षापासून नित्यनेमाने सुरू असलेल्या प्रभात फेरीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. प्रातःकाली भगवंताचे नामस्मरण केल्याने संपूर्ण दिवस आनंदात जातो असे राधाकृष्ण महाराज म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...