आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड - घनसावंगी महामार्गावरील पांगरा ते ताडहदगावदरम्यान बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास कार आणि बोलेरो पिकअपचा समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघातात तीर्थपुरी येथील व्यापारी श्रीराम रामकिसन वाघ (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात वाघ यांची पत्नी रुख्मिण श्रीराम वाघ या जखमी झाल्या आहेत. वाघ पती-पत्नी हे अंबड येथील एका नातेवाइकाच्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला चालले होते.
दरम्यान, अपघात घडल्यानंतर आजुबाजूच्या लोकांनी वाघ पतीपत्नीला अंबडच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तपासून श्रीराम वाघ यांना मृत घोषित केले तर पत्नी रुख्मिन यांना मुकामार व डोक्याला जखम झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना जालना येथे हलविले आहे. श्रीराम वाघ यांचे अंबडच्या सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा तीर्थपुरी येथे अंत्यसंस्कार करण्याज आले. त्यांच्या पश्चात आई, दोन विवाहित व एक अविवाहित अशा तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.
दरम्यान वाघ यांच्या लहान मुलीचा आज बारावीचा निकाल होता त्यात ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली, मुलीला पास झाल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी वडिलांच्या मृत्युशय्येवर रडण्याची दुर्दैवी वेळ आल्याने तीर्थपुरीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.