आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्या:कामाचा होता ताण, परिचिताकडून फसवणूक, मुलगा विक्रांतने सांगितली एएसआयची व्यथा

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष गायकवाड
  • नोकरी पिस्तूल सर्व्हिसिंगची, ड्यूटी लावली स्कॉटिंगची, ड्यूटी अटोपताच संपवले जीवन

पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार सुभाष गायकवाड यांनी डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केल्याने जालना पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचे नेमके कारण अजून पुढे आलेले नाही. मात्र, कार्यालयातील शस्त्रांच्या अपूर्ण असलेल्या नोंदी, यामुळे डोक्यावर कारवाईची टांगती तलवार, त्यातच एका परिचिताकडून झालेली आर्थिक फसवणूक या कारणातून त्यांना काही दिवसांपासून नैराश्य आले होते. त्यातच सोमवारी रात्री नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त दुसरीच ड्यूटी लावल्याने आलेल्या तणावातून गायकवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

१९८५ मध्ये रुजू जिल्हा पोलिस दलात रुजू झालेले झालेले सुभाष गायकवाड (५४, जालना) हे सध्या पोलिस मुख्यालयातील आयुधिक कर्मशाळेत कार्यरत होते. या ठिकाणी त्यांच्याकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पिस्तूल सर्व्हिसिंगची जबाबदारी आहे. परंतु, त्यांना सोमवारी रात्री १२ वाजता अचानक सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांच्या सुरक्षेसाठी स्कॉटिंगला पाठवण्यात आले. मानव यांना जिल्ह्याच्या हद्दीतून सुरक्षित पुढे रवाना केल्यानंतर मंगळवारी सकाळी ते मुख्यालयात शस्त्र जमा करण्यासाठी आले. त्याच वेळी शस्त्रागाराच्या पाठीमागील बाजूला जाऊन त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. फायरिंगच्या आवाजाच्या दिशेने त्यांचे सहकारी धावले. मात्र त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, डीवायएसपी सुधीर खिरडकर आदी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

जुन्या नोंदी अपूर्ण असल्याने ते होते तणावात

सुभाष गायकवाड यांना काही दिवसांपूर्वीच हेड कॉन्स्टेबल पदावरून सहायक फौजदारपदी बढती मिळाली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती पोलिस मुख्यालयातील आयुधिक कर्मशाळेत करण्यात आली होती. या ठिकाणी शस्त्रांची सर्व्हिसिंग करण्याची व त्यांच्या नोंदी ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. परंतु, जुन्या नोंदींचे रजिस्टर अपूर्ण होते. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या पथकाने त्यांच्या कर्मशाळेची तपासणी केली होती. जुन्या नोंदी अपूर्ण असल्याने ते तणावात होते. वरिष्ठांना या प्रकाराची माहिती दिली तर तुमच्यावरही कारवाई होईल, अशी धमकी त्यांना दिली जात होती. शिवाय एका परिचिताने त्यांच्याकडून उधारीने पैसे घेतले होते. मागणी करूनही ते परत केले नाही. यातून ते तणावात होते. यातच सोमवारी दुसरीच ड्यूटी लावल्याने त्यांच्या संयमाचा कडेलोट झाला. गायकवाड यांचा मुलगा विक्रांत यानेच एस.पी. चैतन्य यांना ही माहिती दिली.

लातूरला जाण्याची तयारी

नातेवाइकांना भेटण्यासाठी गायकवाड मंगळवारी लातूरला जाणार होते. यासाठी भाड्याने वाहनही पाहत होते. परंतु, सोमवारी रात्री स्कॉटिंगच्या ड्यूटीवर त्यांना जावे लागले. रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांनी नातेवाइक, मित्रमंडळींना गुड मॉर्निंगचे मेसेजही टाकले. यानंतर मुख्यालयात सकाळी त्यांनी आत्महत्या केली.

घटनाक्रम

  • रात्री १२.०० श्याम मानव यांच्या स्कॉटिंगसाठी रवाना
  • १.३० वाजता नातेवाइकांना पाठवले गुड मॉर्निंगचे मेसेज
  • सकाळी ८ वाजता सोशल मीडियावर ठेवला मुलाचा फोटो
  • ८.३० वाजता कंट्रोल रुमला स्काॅटिंगहून परतल्याची दिली माहिती
  • ८.५८ वाजता शस्त्रागाराच्या पाठीमागील बाजूला जाऊन आत्महत्या

स्टेटमेंट घेणे सुरू

आत्महत्याप्रकरणी कार्यालयातील त्यांच्या सहकारी वरिष्ठांचे स्टेटमेंट घेणे सुरू आहे. लवकरच वरिष्ठांकडे याचा अहवाल सादर करू. राजेंद्रसिंह गौर, पो.नि. गुन्हे शाखा.

एएसआय गायकवाड यांचा मुलगा विक्रांत याची विचारपूस करताना जालना जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्य.