आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:परतुरात साकारतेय नेत्रसेवा चिकित्सालय, लायन्स क्लबचा पुढाकार

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालनासह शेजारील चार जिल्ह्यांतील १३ हजार ५०० नेत्र रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या लायन्स क्लबने परतूर शहरात अद्ययावत दृष्टी नेत्रसेवा चिकित्सालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी तीन मजली बांधकाम सुरू असून तळमजला व पहिल्या मजल्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. कोरोनाकाळ वगळता मागील सहा वर्षांपासून लायन्स क्लबतर्फे समर्पित भावनेने सुरू असलेला नेत्रचिकित्सा प्रकल्प नेत्र रुग्णांना संजीवनी देणारा ठरला आहे.

जालना व परतूर लायन्स क्लबतर्फे वर्ष २०१६ पासून प्रत्येक महिन्यात चार नेत्रतपासणी शिबिरे घेतली जातात. आतापर्यंत घेण्यात आलेल्या ३५० शिबिरांत ७२ हजार गरजूंनी मोफत तपासणी करण्यात आली असून १३ हजार ५०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यापैकी १३ हजार रुग्णांवर चिकलठाणा येथील लायन्सच्या नेत्रसेवा रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यात आली.

दरम्यान, वाढती नेत्ररुग्णांची संख्या लक्षात घेऊन प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांच्या मार्गदर्शनाखाली व मनोहर खालापुरे यांच्या नेतृत्वात लायन्स क्लबमार्फत रुग्णांच्या सोयीसाठी परतूर येथे सर्व सुविधायुक्त नेत्रचिकित्सा हॉस्पिटल उभारणीचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. यासंदर्भात पुरुषोत्तम जयपुरिया म्हणाले, नेत्र तपासणी शिबिरात नियमितपणे ४०० रुग्ण तपासणीसाठी येतात. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा ओढा आहे.

यामुळे नेत्र तपासणीसह डायलिसिसची सुविधा असलेले सुसज्ज रुग्णालय परतूर शहरात बांधण्याचा निर्णय घेतला आहे. लायन्स क्लबचे अध्यक्ष मनोहर खालापुरे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम जयपुरिया, संचालक श्याम लोया, अतुल लढ्ढा, सुनील बियाणी, प्रशांत राखे, महेश होलाणी, बबनराव उन्मुखे, परमेश्वर राजबिंडे, प्रवीण जेथलिया, भास्कर खोसे यांच्या देखरेखीखाली लोकसहभागातून साकारले जात असलेले नेत्रचिकित्सालय पुढील वर्षात रुग्णसेवेसाठी सज्ज होणार आहे. यामुळे गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास प्रांतपाल जयपुरिया यांनी व्यक्त केला.

गरजूंना दृष्टी देण्यासाठी प्रयत्न
तीन मजली नेत्र रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. सध्या तळमजला व पहिल्या मजल्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. येत्या पाच महिन्यांत सर्व शस्त्रक्रिया साहित्य, दोन नेत्ररोगतज्ज्ञ व १३ कर्मचारी, डायलिसिस अशा सुविधा उपलब्ध होतील. यात मोतीबिंदू, टेरिझमसह डोळ्यांच्या आजारांवर शस्त्रक्रिया केल्या जातील. तळागाळातील नागरिकांना महागड्या शस्त्रक्रिया अल्पदरात तर अत्यंत गरीब व गरजवंतांना मोफत शस्त्रक्रिया करून नवी दिव्यदृष्टी देण्याचा लायन्सचा प्रयत्न आहे.- पुरुषोत्तम जयपुरिया, प्रांतपाल लायन्स क्लब

बातम्या आणखी आहेत...