आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांची तस्करी:इंजेक्शनने करायचे जनावरे बेशुद्ध; गायी-बैलांसाठी "कोडवर्ड’

जालना / लहू गाढे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मोकाट जनावरांची चोरी वाढली आहे. कोणत्या भागात मोकाट जनावरे आहेत, रोडच्या कडेला जनावरे थांबली आहेत का, गोठ्यात कुणी नाही, याची माहिती देणारे आरोपींचे ज्या-त्या भागांत खबरे आहेत. रात्रीच्या वेळी जनावरांना वाहनात टाकायचे, हालचाल करू नये म्हणून बेशुद्ध होण्याचे झायलोविन इंजेक्शन द्यायचे, अन् तीन ते चार तासांमध्ये तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. दरम्यान, गायीला (चव्हाण) तर बैलाला (राठोड) लाया हूँ, असा कोडवर्ड होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

जालना शहरातील काही भागांतून वाहनांमधून जनावरे चोरीस जाण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक आरोपी पोलिसांनी निष्पन्न केले. जेलमधून सुटल्यानंतर हे आरोपी पुन्हा हे गुन्हे करत आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी पकडल्यानंतर त्यांच्यावर २४ गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी शहरातील कन्हैयानगर भागातील एका शेतात जनावरांची चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस त्या भागात पोहोचले होते. परंतु, आरोपींनी पोलिसांवर दगडफेक केली होती. याप्रसंगीही काही आरोपी फरार झाले होते.

जनावरे कारमध्ये टाकण्यासाठी सीट टाकतात काढून
जनावरे चोरल्यानंतर त्यांना कारमध्ये बेशुद्ध करून आडवे टाकले जाते. यासाठी कारमधील सीट काढून टाकले जातात. जनावरांची तस्करी करण्यासाठी या आरोपींनी मुद्दामहून अशा वाहनांची सोय केली आहे.

जनावराची रात्री चोरी होऊन सकाळी ६ पर्यंतच कत्तल
जनावराची चोरी झाल्यानंतर दोन-तीन तासांत या जनावराला कत्तलीच्या ठिकाणी नेले जाते. सकाळी ६ वाजेच्या अगोदरच त्याची कत्तल केली जाते, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

कारवाया करून आरोपी निष्पन्न केले
जनावरे चोरीतील अनेक गुन्हे उघडकीस आणले. अनेक आरोपी निष्पन्न केले आहेत. वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई होण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तडीपार, मोक्काबाबतचे, जिल्हाबंदीबाबतचे प्रस्ताव करणार आहोत. - सुभाष भुजंग, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना.

बातम्या आणखी आहेत...