आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जालना ते नांदेड या १७९ किमीच्या एक्स्प्रेस-वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून २१४० कोटींचे कर्ज घेण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णय ८ मार्च रोजी निघाला आहे, तर दोन दिवसांनंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनीही बैठक घेऊन तातडीने जमिनीचे दर निश्चित करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले. येत्या १५ मार्चपर्यंत दरनिश्चिती होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत मूल्यांकन होतील व त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांकडून संमतिपत्रे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी गत महिन्यात १२ फेब्रुवारी रोजी व्हिडिअो कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन या प्रकल्पास गती देण्याच्या सूचना केल्या होत्या. यात भूसंपादन हा विषय प्राधान्यक्रमावर होता. तत्पूर्वी जमिनीचे दर निश्चित करणे अपेक्षित होते. मात्र, या बैठकीनंतर एक महिना होत आला तरीही त्या-त्या यंत्रणांकडून दरनिश्चितीचे काम पूर्ण न झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी आढावा बैठक घेऊन विभागनिहाय माहिती घेतली. यात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वने, सार्वजनिक बांधकाम विभाग व कृषी विभागाकडून दर निश्चित झाले नसल्याची बाब पुढे आली.
दर निश्चितीपाठोपाठ मूल्यांकनही आवश्यक
जमिनीचे दर निश्चित झाल्यानंतर झाडे, विहिरी, कूपनलिका, कच्ची-पक्की घरे, फळबागा, त्या-त्या विभागाच्या योजना अशी एकत्रित माहिती संकलित झाल्यावर जालना व परतूर उपविभागीय अधिकारी स्तरावरून मूल्यांकन ठरवले जाऊन त्यानुसार शेतकऱ्यांना द्यावयाच्या मोबदल्याची रक्कम ठरेल. परभणी व नांदेडमध्येही या पद्धतीने काम करावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी यास संमती दिल्यावरच प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीसाठीची निविदा, कंत्राटदार निश्चिती, कार्यारंभ आदेश दिले जातील, असे सूत्रांनी सांगितले.
पुणे रिंगरोडसाठीही कर्ज घेण्यास मान्यता
जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी २१४० कोटी तर पुणे रिंगरोड (पश्चिम क्षेत्र) या प्रकल्पाच्या भूसंपादनाकरिता ३५०० कोटी असे दोन्ही मिळून ५६४० कोटी इतके कर्ज हुडकोच्या अटी व शर्तीनुसार घेण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.