आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाचाबाची:सेलू येथे पोलिस कर्मचारी, वाहनचालकात बाचाबाची

सेलू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पोलिस ठाण्यात कार्यरत एका सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपायाने वाहन अडवल्याच्या कारणावरून त्यांची वाहनचालकासाेबत बाचाबाची झाल्याची घटना १६ डिसेंबरच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. मात्र, शनिवारी दुपारपर्यंत तरी पोलिसांकडून घटनेस कोणताही दुजोरा मिळाला नाही. अधिकारीही बोलायला तयार नाहीत. शहरात मात्र पोलिस अधिकार्‍यासह कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची जोरदार चर्चा आहे.

रात्रीच्या वेळी गोवंशाची वाहतूक करणारी वाहने देखील धावत असतात. अशाच एका वाहनास शुक्रवारी रात्री सेलू पोलिस ठाण्यातील एका सहायक पोलिस निरीक्षक व शिपायाने हात दाखवला. वाहन थांबल्यानंतर चालक आणि पोलिस कर्मचाऱ्यांत खडाजंगी झाली. शाब्दिक वादानंतर प्रकरण हातघाईवर गेल्याचे समजते. या घटनेची सकाळी शहरात जोरदार चर्चा सुरु झाली.

या घटनेसंदर्भात सेलू पोलिसांशी संपर्क साधला, मात्र, असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांसोबत बाचाबाची झाली आणि पोलिसांवर हात उगारण्यात आला असेल तर पोलिस मवाळ भूमिका का घेत आहेत? त्या चालकाच्या मुसक्या का आवळल्या जात नाही? असा प्रश्न सेलूकरांतून उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफणे यांनी शनिवारी पोलिस ठाण्यात भेट दिली असून, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे हे देखील येणार आहेत. त्यांच्या भेटीनंतर गुन्हा दाखल करण्याच्या या हालचालींना वेग येईल. तोपर्यंत मात्र वाहनधारकांनी पोलिसांवर हात उचलण्याची चर्चा थांबेल असे वाटत नाही.

बातम्या आणखी आहेत...