आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडी इफेक्ट:अर्जुन खोतकरही शिंदे गटाच्या वाटेवर, दिल्लीत गाठीभेटी

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश घेतल्याचे वृत्त सोमवारी धडकले आणि जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील शिवसैनिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली. खोतकर यांनी सोमवारी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा रंगली होती. त्याशिवाय काही माध्यमांनी यासंदर्भातील बातम्याही प्रसिद्ध केल्या. विशेष म्हणजे काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नाने हा प्रवेश झाल्याचे जाहीर केले. खोतकर यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला. दिल्लीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी कबूल केले.

प्रवेश झाल्याच्या वृत्तावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. खोतकर यांच्या पाठीमागे सध्या ईडीचा ससेमिरा सुरू आहे. त्यांच्याशी संबंधित रामनगर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. खोतकर यांची याच कामासाठी मुंबई आणि दिल्लीवारी सुरू असते. एकाच आठवड्यात दोन वेळा दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात त्यांची व मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली. दानवे यांच्या मध्यस्थीने त्यांचा प्रवेश झाल्याची चर्चा होती. खोतकर यांनी त्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. शिवसेनेचे जालना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी या प्रवेशाच्या चर्चेचा इन्कार केला आहे.

मी तर बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक...
^ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यात काहीच गैर नाही. दिल्लीत त्यांची आणि माझी भेट झाली. या भेटीवेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार कपिल पाटील यांच्यासह अन्य काही लोक उपस्थित होते. मी बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे आणि अजूनही शिवसेनेतच आहे. - अर्जुन खोतकर, शिवसेना उपनेते.

बातम्या आणखी आहेत...