आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आष्टी:आष्टी-सातोना रस्त्यावर बंदुकीचा धाक दाखवत कार पळवली; तासाभरात गाडी, एक जण ताब्यात

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इतर आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना

परतूर तालुक्यातील आष्टी-सतोना रस्त्यावर चालकाला बंदुकीचा धाक दाखवत खाली उतरवून स्विफ्ट डिझायर गाडी पळवल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास हस्तूर पाटीजवळ घडली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कुंभार पिंपळगाव येथे एकास गाडीसह ताब्यात घेतले. आष्टी पोलिस ठाण्यातील कर्मचारी अमोल तिबोले याना गाडीमालक भागवत घाडगे यांनी फोन करून सांगितले की, त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी (एमएच २१ एएक्स २५९०) चालक बळीराम टेकाळे हा सेलू येथून एकटाच घेऊन येत असताना त्याला आष्टी-सातोना रस्त्यावर हस्तूर तांडा पाटीजवळ पल्सर गाडीवर तिघांनी येत गाडी आडवी लावत थांबवून बंदुकीचा धाक दाखवत, त्याचा मोबाइल पाकीटसह गाडी घेऊन त्याला खाली उतरून पळाले आहेत, असे सांगितले. तिबोले यांनी तत्काळ ही माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप यांना दिली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत गाडीचा नंबर व माहिती नजीकच्या पाथरी, सेलू, कुंभार पिंपळगाव, घनसावंगी, अंबड, परतूरसह वरिष्ठांना दिली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत गाडी घेऊन पसार झालेल्या आरोपींच्या दिशेने तपास सुरू असतानाच पोलिसांना गाडी कुंभार पिंपळगाव येथील चौकीच्या कर्मचाऱ्यांनी पकडल्याची माहिती दिली. आष्टी पोलिसांनी तत्काळ कुंभार पिंपळगाव येथून गाडीसह आरोपीस बंदुकीसह ताब्यात घेतले. मात्र त्याचे दोन साथीदार यादरम्यान पल्सर गाडीसह पसार झाले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप, कर्मचारी अमोल तिबोले, सूरजसिंग चारावनडे, आर. आर. गौड, बिक्कड यांच्यासह कुंभार पिंपळगाव चौकीचे उपनिरीक्षक शिवसिंग बहुरे, भागवत हरिश्चंद्रे, आर. व्ही केंद्रे, परुळे आदींनी केली. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात बळीराम टेकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बद्रीनाथ प्रभाकर घुगेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ हजारांच्या बक्षिसाची शिफारस वरिष्ठांकडे करणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांनी सांगितले.

इतर आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना
आम्हाला माहिती मिळताच आम्ही तत्काळ नाकेबंदी करीत एक आरोपी बंदुकीसह ताब्यात घेतला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून इतर दोन आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. - सुभाष सानप, सहायक पोलिस निरीक्षक, आष्टी.

बातम्या आणखी आहेत...