आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघु मध्यम प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा:जुलै संपला तरी भोकरदन तालुक्यातील विविध तलावांमध्ये जेमतेम जलसाठा

पिंपळगाव रेणुकाई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षी ओव्हरफ्लो झालेले भोकरदन तालुक्यातील सर्वच लहानमोठे १६५ पाझर तलाव तसेच ५ लघु-मध्यम प्रकल्प पावसाळ्याच्या प्रारंभीच ओव्हरफ्लो झाले होते. यंदा मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला, जुलै संपला तरी विविध प्रकल्पांत जेमतेमच जलसाठा आहे.

या वर्षी हवामान खात्याने सुरुवातीला चांगल्या पावसाचा अंदाज दिला असला तरी याला भोकरदन तालुका अपवाद ठरला आहे. जून महिना अर्धा संपल्यावर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर काही भागात जून संपल्यावरही पाऊस नव्हता. त्यामुळे त्यांना जुलै महिन्यात पाऊस पडल्यावर खरीप पेरणी पूर्ण करावी लागली. हा पाऊस पेरणीयोग्य असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करीत जवळजवळ एक लाख नऊ हजार हेक्टरवर तालुक्यात खरीप पेरणी पूर्ण केली.

पेरणीनंतर अनेक ठिकाणी तर पावसामुळे पिके वाया गेली आहेत. परंतु आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे कुठेही जलसाठ्यात वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. दुष्काळात नेहमी वरदान ठरत असलेले शेलूद येथील धामणा प्रकल्प, दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पात तर पिंपळगाव कोलते, बरंजळा साबळे, प्रल्हादपूर या लघु प्रकल्पांत जेमतेम जलसाठा आहे. तसेच शेती विकासासाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या १६५ पाझर तलावांपैकी काही तलावांत बऱ्यापैकी जलसाठा आहे, तर काही तलावांत केवळ निमित्तमात्र पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. धामणा व जुई प्रकल्पावर जवळजवळ ५० गावांतील नागरिकांचा पाणी प्रश्न अवलंबून आहे. हे दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने जर भरली तर पाण्याचा प्रश्न निकाली लागू शकतो. शिवाय दोन्ही धरणांतील मागील तीन ते चार वर्षांपूर्वी शासनाच्या गाळमुक्त धरण योजनेतून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा झाला असल्याने या धरणांतील पाण्याची साठवण क्षमता वाढली आहे. त्याचा प्रत्यय भोकरदन तालुक्यातील जनतेला मागील काळात आला असून या कामामुळे दुष्काळाचे सावट कमी झाले आहे.

मोठ्या पावसावर अवलंबून आहे रब्बी हंगाम, परिसरातील नदी-नाले कोरडेठाक

प्रशासनाने गाफील राहू नये
भोकरदन तालुक्यातील धामणा धरणात सध्या ३१ टक्के म्हणजेच ४.८३ दलघमी तर जुई धरणात ३३ टक्के म्हणजेच २ दलघमी एवढाच पाणीसाठा आहे. या दोन्ही धरणांवर भोकरदन शहरासह जवळजवळ लहान-मोठ्या पन्नास गावांची मदार आहे. परंतु पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले असले तरी या धरणात पाहिजे तेवढा पाणीसाठा जमा झाला नसल्याने ही बाब निश्चितच जनतेसाठी येणाऱ्या काळात चिंतेची ठरणार आहे.

ग्रामपंचायतीने वाॅटर मीटर बसवावे
गतवर्षी धामणा व जुई धरण ओव्हरफ्लो झाले होते. यंदा मात्र मोठा पाऊस झाला नसल्याने धरणात सध्या जेमतेम पाणीसाठा शिल्लक उरला आहे. धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीने वाॅटर मीटर बसवून गावाच्या गरजेनुसारच पाणी उपसा केल्यास पाण्याचा अपव्यय होणार नाही, अशी प्रतिक्रिया पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एस. जी. राठोड यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...