आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीर्थपुरी ते शहागड रोडच्या पुलाच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्री राजेश टोपे यांनी सार्वजिनक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी कांडलीकर यांना सूचना केली होती. परंतु त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने या सूचनेला केराची टोपली दाखवण्यात आल्याने या सर्व अधिकाऱ्यांच्या जिथे गाड्या दिसतील तिथे त्यांच्या गाड्यांच्या टायरची हवा सोडून त्यांचा निषेध करण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी ते शहागड राज्य मार्गावरील खडकी नाल्यावरील पुलाच्या नळ्यामध्ये गाळ साचल्याने तसेच आजूबाजूला झाडे-झुडपे वाढल्याने थोड्याशा पावसाने पुलावरून पाणी वाहून रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या भागातील शिवाजीनगर, दैठणा, भणंग जळगाव, एकलहेरा आदी गावातील लोकांना तिर्थपुरीकडे येण्यास मोठी अडचण होऊन जाते.
या त्रासाला कंटाळून तिन्ही गावातील लोकांनी पालकमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन या पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. पालकमंत्री टोपे यांनी देखील तितक्याच तत्परतेने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मधुसूदन कांडलिकर यांना खडकी नाल्याच्या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना देऊन ग्रामस्थांना आश्वस्त केले होते. परंतु सूचना देऊन दोन महिने होत आले तरी या पुलाची दुरुस्ती तर दूरच कार्यकारी अभियंता कांडलिकर यांनी साधी पाहणी सुद्धा केली नसून पालकमंत्र्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवल्याचा आरोप ग्रामस्थानीं केला आहे.
यासंदर्भात ग्रामस्थानीं घनसावंगीच्या तहसीलदारांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की. पालकमंत्र्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अकार्यक्षम कार्यकारी अभियंता मधुसूदन कांडलिकर यांच्या बदलीसाठी आंदोलन करण्याचा वरील गावातील नागरिकांनी आता ठाम निर्णय घेतला असून दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला तिर्थपुरी ते शहागड राज्यमार्गावरील खडकी नाल्यावरील पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी यांना पुलाची दुरुस्ती होईपर्यंत घनसावंगी तालुक्यात फिरू देणार नाहीत. वरील सर्व अधिकाऱ्यांच्या जिथे गाड्या दिसतील तिथे त्यांच्या गाड्यांच्या टायरची हवा सोडून त्यांचा निषेध करण्याचा इशारा गणेश पघळ, भारत परदेशी, तुकाराम बुलबुले, अशोक खेत्रे, देवानंद काळे, महादेव आव्हाड, राम खेत्रे, उमाकांत बुलबुले आदींनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.