आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन महिन्यांपूर्वी एका जणास जिवे मारण्याच्या प्रकरणातील आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या सहायक पाेलिस निरीक्षकासह ४ कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळूमाफियाने वाहन घातले. मात्र, पोलिस सावध असल्याने अनर्थ टळला. ही घटना देवपिंपळगाव-कुंभारी रस्त्यावर २ जुलैला सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी परमेश्वर शिवराम मताडे या एका आरोपीस ताब्यात घेतले असून संजय उगले हा पसार झाला.
संजयविरुद्ध बदनापूर ठाण्यात ३ महिन्यांपूर्वी कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. संजय उगले हा वाळूमाफिया असून राजकीय मंडळींचा हस्तक असल्याने तो बिनधास्तपणे अवैध वाळू उपसा करत असल्याचा आरोप होत आहे. संजय हा गावात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यास अटक करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी कर्मचाऱ्यांसोबत सापळा लावला. परंतु, पोलिस आल्याचा सुगावा लागल्याने आरोपीने देवपिंपळगाव ते कुंभारी रस्त्यावर स्कॉर्पिओ चालवून सपोनि सुदाम भागवत व सहकाऱ्यांच्या अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच स्वतःचा बचाव केला.
पाठलाग करून एका आरोपीला वाहनासह पकडले
पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. संजय उगले व इतरांनी पळ काढला, तर परमेश्वर शिवराम मताडे (डोंगरगाव) यास वाहनासह पकडण्यात आले. पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपीविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनात नानासाहेब इंगळे (कुंभारी) याच्यासह अन्य एक जण होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.