आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी:आयुष रुग्णालय, वनोद्यानाला जागा मिळाली; इमारतीसाठी निधी मिळेना

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमांतर्गत जालन्यात ३० खाटांचे आयुष रुग्णालय, वनोद्यानाची निर्मिती केली जाणार असून यासाठी जिल्हा रुग्णालयाजवळच तीन एकर जागेचा ताबाही मिळाला आहे. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही इमारत बांधकामासाठी निधी न मिळाल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या जागेतच रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

आयुर्वेद उपचार पद्धतीचा रुग्णांना फायदा व्हावा यासाठी राष्ट्रीय आयुष मिशन हाती घेण्यात आले आहे. यातील आयुर्वेदिक, योगा, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी अशा पाचही उपचार पद्धतीद्वारे एकाच छताखाली उपचार करण्यासाठी आयुष रुग्णालय उभारणीला सहा महिन्यांपूर्वी मंजुरी मिळालेली आहे.

सर्वसामान्य लोकांना विविध वनौषधींच्या माहितीसाठी वनोद्यानही साकारले जाणार आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आयुष रुग्णालयासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत. राज्यात सत्तांतरानंतर हा विषय लांबणीवर पडला. आयुष विभागाचे जिल्हा सल्लागार डॉ. कुलदीप वाकपांजर यांचा पाठपुरावा सुरु आहे.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार आयुष रुग्णालय
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, नंदुरबार, सिंधुदुर्ग व पुणे या चार ठिकाणी प्रत्येकी ३० खाटांच्या आयुष रुग्णालयास केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे. त्याच धर्तीवर राज्यात ३० जिल्ह्यांत आयुष रुग्णालय स्थापन होणार असून यात जालन्याचा समावेश आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल उभारल्यास अॅलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथीबरोबरच आयुष उपचार-पद्धतीचा पर्यायही रुग्णांना मिळणार आहे.

आयुष उपचार पद्धतीबाबत जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडून सर्वेक्षणाचे काम सुरू
जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून राष्ट्रीय नमुना पाहणी क्षेत्र कार्यक्रमास प्रारंभ झाला असून जुलै २०२२ ते जून २०२३ या कालावधीत आयुष पद्धतीच्या वापराबाबत माहिती गोळा केली जात आहे. यात आयुष ची माहिती असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी, पाहणीच्या अगोदर मागील ३६५ दिवसांत आयुषद्वारे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी, रुग्णालयात वापरलेली आयुष पद्धती (आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्धा व होमिओपॅथी) याबाबत माहिती, आयुष पद्धती व आयुष औषधांवरचा खर्च, बाह्य रुग्णांची टक्केवारी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात आयुषचा वापर याची विस्तृत माहिती घेतली जात आहे.

राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या पीआयपीकडे लक्ष
राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत (पीआयपी - प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन प्लॅन अर्थात प्रकल्प अंमलबजावणी आराखडा) दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये निधीसह मंजूर होऊन येतो. मात्र, कोरोनामुळे यात खंड पडला असून वर्ष २०२२-२३ व २०२३-२४ असा दोन वर्षांचा पीआयपी मंजूर होणार असल्याचे पत्र केंद्राकडून प्राप्त झाले आहे. त्यामुळे या पीआयपीकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे. यातच आयुष हॉस्पिटलच्या इमारतीचा समावेश असू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...