आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या बेकरी उद्योगाला चालना देत नवउद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी जालना एमआयडीसीतील टप्पा तीनमध्ये दोन हजार चौरस मीटरमध्ये बेकरी क्लस्टर उभारले जाणार आहे. याकरिता जिल्ह्यातील छोट्या ३५ बेकरी व्यावसायिकांना एकत्र करून त्यांच्या माध्यमातून कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारले जात असून यातून प्रत्यक्ष ५०-६० तर अप्रत्यक्षरीत्या एक हजारावर रोजगारनिर्मिती शक्य होणार आहे. यासाठी साडेतीन कोटींचा डीपीआर तयार करून जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
साधारणत: धान्याचे पीठ भिजवून, मळून, तिंबवून, आंबवून व भाजून तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांना बेकरी उत्पादने म्हटले जाते. बेकरी उत्पादने ही उष्णतेने शिजवली वा भाजली जातात. यातून विविध प्रकारचे पाव, बिस्किटे, केक, बन, रोल, खारी आदी तयार केले जातात. जालना जिल्ह्यात छोटे-मोठे २५० वर बेकरी व्यावसायिक असून ते घरगुती किंवा छोट्या जागेत एकत्रित येऊन बेकरी चालवतात.
याद्वारे केवळ स्थानिक पातळीवरील मागणी भागवली जाते किंवा शेजारील जिल्ह्यात विक्री केली जाते. त्यामुळे शहर, जिल्हा किंवा विभाग एवढाच विचार न करता मजबूत उत्पादन, विक्री व वितरण साखळी विकसित करून राज्यासह परराज्यात बेकरी उत्पादने पोहोचवणे, अधिकाधिक नफा मिळवणे, गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या साह्याने ब्रँड विकसित करणे आदींसाठी बेकरी क्लस्टरची मोठी मदत होणार आहे.
यासाठी शासनाकडून प्रकल्पाच्या ७५ टक्क्यापर्यंत अनुदान स्वरूपात अर्थसाह्य उपलब्ध होणार असून बँकांमार्फतही कर्जपुरवठा केला जाणार आहे. केवळ अर्थसाह्य नव्हे, तर बेकरीचे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण, यंत्रसामग्री हाताळणी, प्रत्यक्ष उत्पादन, विक्री व्यवस्थापन, बँकिंगचे व्यवहार अशा टप्प्यांचा समावेश असणार आहे. अधिकाधिक तरुणांनी अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळावे यासाठी क्षमता बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे व्यवसाय एखाद्या विशिष्ट व्यक्ती, समूह, स्थळ किंवा वेळेपुरता मर्यादित न राहता चिरंतन चालत राहावा यादृष्टीने क्लस्टरची बांधणी केली जाणार आहे.
जालन्यात चौथे क्लस्टर
मंठा येथील लेदर क्लस्टर, जाफराबादेतील फेब्रिकेशन क्लस्टर, जालन्यातील स्पाइस क्लस्टरनंतर आता बेकरी क्लस्टरची भर पडणार आहे. शासनाच्या मदतीने स्थानिक पातळीवर सामुदायिक सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे परंपरागत व्यावसायिकांबरोबरच नववउद्योजकांनाही यात वाव मिळण्यास मदत होणार आहे.
साडेतीन कोटींचा डीपीआर शासनाला सादर
जालन्यात बेकरीची संख्या मोठी असली तरी हा उद्योग असंघटित स्वरूपात चालतो. यामुळे उद्योगवाढीला मर्यादा पडत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन एमआयडीसी टप्पा -३ मध्ये बेकरी क्लस्टर प्रस्तावित केले असून यासाठी २५ व्यावसायिक एकत्र आले आहेत. त्यांच्या माध्यमातून साडेतीन कोटींचा डीपीआर तयार करून तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे. मार्चपर्यंत याला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. या क्लस्टरमुळे जुने व नवउद्योजक एकत्र येऊन बेकरी उद्योगाला नवी ओळख देतील. यातून प्रत्यक्ष ५०-६० तर अप्रत्यक्षरीत्या हजारावर रोजगारनिर्मिती होईल.- करुणा खरात, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जालना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.