आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशागतीला वेग:उमेद कायम ठेवत काळ्या आईची ओटी भरण्यास बळीराजा सज्ज, भरारी पथक गायब; चढ्या दराने बियाणे, वाणांची विक्री

हसनाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरात उमेद कायम ठेवत काळ्याआईची ओटी भरण्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. सोमवारी संध्याकाळी पावसाच्या सरी हसनाबाद सह परिसरात बरसल्याने शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. खरिपातील पेरणीची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पैश्यांची जुळवाजुळव आहे त्यांची शेतीची कामे आटोपली असून ते कृषी केंद्रात बियाणे व खते घेण्यासाठी गर्दी करत आहेत. गावागावात कृषी विभागाने सोयाबीन पिकाचे प्रात्यक्षीकरण करून दाखवणे, शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया समजावून सांगणे, तसेच दर्जेदार बियाणांचे मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रकारची खते व बियाणे योग्य दरात कशी मिळतील याकडे कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

हसनाबाद परिसरातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, संबंधित विभागाचे तपासणी पथक गायब आहे. आपल्या गावाला कोणता कृषी सहाय्यक आहे याचा मोजके दोन चार शेतकरी सोडले तर इतर कुणालाच माहिती नाही. शेतकऱ्यांची संपूर्ण वर्षाचे अर्थकारण हे खरीप हंगामावर अवलंबून आहे. मका, कापूस, सोयाबीन ही पिके प्रामुख्याने हसनाबाद शिवारात घेतली जातात. यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचे संकेत दिल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पैशांची कमतरता असून सुद्धा बळीराजा काळ्‍या आईची ओटी भरण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे. शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम तोंडावर आला आहे, अनेक शेतकरी पीक कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवत आहे. मात्र पीक कर्ज वाटपाने वेग घेतल्याचे चित्र सध्या तरी हसनाबाद येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या हसनाबाद येथील शाखेत दिसत नाही. त्याकडे या भागातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे शिवार बहरण्यासाठी निसर्गासह कृषी केंद्र चालक, बँक,कृषी विभाग, लोकप्रतिनिधी,आदींनी बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांना सक्ती
हसनाबाद येथील काही कृषी केंद्रावर कपाशीच्या वाणाची चढ्या भावाने विक्री केली जात आहे. तसेच सर्व बियाणे देखील आमच्या कडूनच घ्यावे अशी दुकानदाराची शेतकऱ्यांना सक्ती केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...