आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनांना बंदी:अंबड चौफुली ते मालधक्क्यापर्यंत जड वाहनांना बंदी

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिमेंट नेणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. रेल्वे मालधक्क्याहून माल नेण्यासाठी अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही ही वाहने धावत असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर १ डिसेंबर रोजी ‘दर तासाला धावतात २३ अवजड वाहने; वर्षभरात दोघांचा मृत्यू, शेकडोंना अपंगत्व’ या मथळ्याखाली दिव्य मराठीत वृत्त प्रकाशित होताच पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार या परिसरातून होणारी अवजड वाहतूक दिवसा बंद करण्यात आली आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी पत्रही काढले आहे.

जड वाहनांच्या वाहतुकीला शहरात बंदी असतानाही मालवाहू ट्रक, टेम्पोसारख्या मोठ्या वाहनांचा शहरात मुक्त संचार सुरू असतो. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा तर होताच, शिवाय अपघाताचाही धोका असतो. दोन दिवसांपूर्वी नूतन वसाहत भागात ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा नाहक बळी गेल्याची घटना घडली. त्यामुळे शहर वाहतूक शाखेने सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहनांना शहरात पूर्णत: बंदी केली आहे.

याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रेल्वेतून येणारे धान्य व खत वाहतुकीला अत्यावश्यक सेवा म्हणून सूट देण्यात आली आहे. जड वाहनांवर चालू वर्षात २०१९ केसेस करण्यात येऊन १३ लाख ७ हजार ७५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच भविष्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांवर कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे जालना शहरात सकाळी ८ ते रात्री ९ वाजेदरम्यान कोणतेही जड वाहन प्रवेश करणार नाही किंवा शहरातून कोणतेही जड वाहन बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्याचे तसेच वाहतूक नियमाचे पालन करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक जी. एस. शिंदे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...