आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोडाऊन:पोकराचा आधार; 51 शेतकरी उत्पादक कंपन्यांना गोडाऊन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतमालाला योग्य भाव मिळावा, व्यापाऱ्यांच्या दलालीपासून सुटका व्हावी. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना एकत्र येत शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन करण्याला पाठबळ दिले आहे. या कंपन्यांना शेतीमाल साठवणुकीसाठी गोडाऊन असावे, यासाठी पोकरा योजनेतून ६० टक्के अनुदान दिले जात आहे. या माध्यमातून जिल्ह्यात १४० जणांनी यासाठी अर्ज केले असून, ५१ गोडाऊन उभी राहिली आहेत. अडचणीच्या काळात हजारो शेतकऱ्यांना आपला शेतीमाल सुरक्षित ठेवण्यासाठी कायमची सोय झाली आहे.

जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने‎ महाराष्ट्र शासन कृषी विभागाची पोकरा ‎योजना ही शेतकऱ्यांच्या जीवनात नवसंजीवनी निर्माण करणारी आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी गट व ‎शेतकरी उत्पादक कंपनी यांना, शेतमाल ‎साठवणुकीसाठी गोदाम व कृषी प्रक्रिया ‎उद्योग उभारून शाश्वत विकास साधता ‎येतो. शेतमाल साठवण्यासाठी‎ ग्रामस्तरावर गोदाम उभारणीसाठी,‎ शेतकरी गटास प्रकल्प खर्चाच्या ६०‎ टक्के अनुदान मिळते. या शेतकऱ्यांना यासाठी अडीचशे शेतकरी संख्या असलेली शेतकरी उत्पादक कंपनी पात्र आहे. दोन ते तीन वर्षाचे ऑडिट, कंपनीकडे व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध भांडवल, गोडाऊन उभारणीसाठी जागा अशा प्रकारच्या अटी-शर्ती पूर्ण करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना गोडाऊन निर्मिती करता येणार आहे. दरम्यान, सध्या जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत.

कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी विविध उद्योग उभे करण्यासाठी धडपड करत आहेत. यामध्ये शेतमाल खरेदी केंद्रे, विविध कंपन्यांना सोयाबीन, मका पुरवण्यासाठीची करार पद्धतीने सुरू केलेले खरेदी बाजार, भुसार माल खरेदी, कृषी सेवा केंद्र आदी बाबी करत आहेत. हे करत असताना शेतीमाल साठवणूक ही मोठी समस्या कंपन्यांपुढे असून याला पोकराचे पाठबळ मिळालेले आहे. कंपनीचा ४० टक्के हिस्सा त्यामध्ये उभा झाल्यास तब्बल २० लाख रुपये खर्चातून कंपनीसाठी मोठे गोडाऊन साकारले जात आहे.

सर्वच साहित्याच्या किमतीत वाढ
गोडाऊन बांधकाम करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या वस्तूंच्या किमती आजच्या काळात कमी झाल्या आहेत. सिमेंट, लोखंड, पत्रा, गिट्टी आदी सर्वच प्रकारच्या साहित्याची किंमत वाढलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना गोडाऊन बांधकाम हे अतिरिक्त खर्चाचे ठरत आहे. परिणामी शासनाने सध्याच्या दरानुसार गोडाऊनची किंमत ठरवावी, अशी मागणी आयडियल शेतकरी उत्पादक कंपनीचे भीमराव डोंगरे यांनी केली

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हक्काचे गोडाऊन
जिल्ह्यात तब्बल ५१ शेतकरी उत्पादक कंपनीकडे हक्काचे गोडाऊन झाले आहे. या कंपन्यांत सरासरी १०० ते २५० शेतकरी सभासद आहेत. म्हणजेच जवळपास साडेबारा हजार शेतकऱ्यांच्या शेतमालाला संकटकाळी सुरक्षित ठेवण्यासाठी कायमची व्यवस्था झाली आहे. याबरोबरच गोडाऊन असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. शिवाय कंपनीला या माध्यमातून आर्थिक उत्पन्नसुद्धा मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज
शेतकऱ्यांच्या शेतीमालाची गुणवत्ता, किंमत वाढवण्यासाठी त्याची ब्रँडिंग करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीचे मोठे पाठबळ लाभले आहे. याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी कंपन्यांची स्थापना करून गोडाऊन उभे करावेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल साठवण्याबरेाबर कंपनीच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्यवसाय करता येतील. -भीमराव रणदिवे, अधीक्षक कृषी अधिकारी, जालना

बातम्या आणखी आहेत...