आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:वेळेवर बिल भरणाऱ्या घरगुती ग्राहकांना लाभ; विजेचे बिल नियमित भरावे यासाठी महावितरणाचे आवाहन

जालना13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी महावितरणने जाहीर केलेल्या बक्षीस योजनेची नागरिकांना एकच उत्सुकता लागली आहे. १ जूनपासून सुरू झालेल्या या योजनेत दरमहा वेळेवर बिल भरणाऱ्या ग्राहकांना बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. एकूण २३८ बक्षिसे असलेल्या महावितरणच्या या ऐतिहासिक योजनेमुळे ग्राहकांचा वीजबिल भरण्यास प्रतिसाद मिळत आहे. घरगुती ग्राहकांना दर महिन्याला वेळेवर वीजबिल भरण्याची सवय लागावी या उद्देशाने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोदावले यांच्या संकल्पनेतून ही अभिनव बक्षीस योजना सुरू करण्यात आलेली आहे. ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरावे यासाठी महावितरण त्यांना वारंवार आवाहन करते परंतु सर्वच ग्राहक वेळेवर आपली बिले भरत नसल्याने थकबाकी वाढत आहे. त्यामुळे महावितरणला वीजखरेदीसह इतर खर्चाचा ताळमेळ बसवणे जिकिरीचे झाले आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाईही महावितरणला करावी लागते. तसेच बिल वेळेवर न भरणाऱ्या ग्राहकांना पुढील बिलात व्याज तसेच विलंब शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टळावा, घरगुती ग्राहकांनी वीजबिल भरण्यास स्वतः पुढाकार घ्यावा आणि त्यांना प्रत्येक महिन्याला बिल भरण्याची सवय लागावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

दरमहा बिल भरण्याचे अनेक फायदे आहेत. बिल तयार झाल्याच्या सात दिवसांत भरल्यास जवळपास एक टक्के तत्पर देयक भरणा सूट मिळते. ऑनलाईन बिल भरल्यास ०.२५ टक्के सूट महावितरणतर्फे देण्यात येत आहे. आधीच उपलब्ध असलेल्या सवलतींबरोबरच या योजनेत भेटवस्तू स्वरूपात विविध बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळत आहे. या योजनेत थकबाकीसह दरमहा संपूर्ण वीजबिल भरणाऱ्या घरगुती वीजग्राहकांमधून सोडत पद्धतीने बक्षिसे काढण्यात येणार आहेत.

ग्राहकांना बिल भरण्याच्या अंतिम मुदतीच्या आत बिले भरावी लागतील. महावितरणचे कर्मचारी वगळता मराठवाड्यातील सर्व घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आहे. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला सोडत काढण्यात येईल. दर महिन्याला मराठवाड्यातील १०१ उपविभागातून हजार रुपयांपर्यतची प्रत्येकी २ बक्षिसे वस्तू स्वरूपात दिली जाणार आहेत. त्यातील एक बक्षीस हे तत्पर देयक भरणा करणाऱ्या ग्राहकास व दुसरे बक्षीस अंतिम मुदतीच्या आत बिल भरणाऱ्या ग्राहकासाठी असेल. यासोबतच दरमहा २२ विभागांतून प्रत्येकी एक मिक्सर ग्राइंडर किंवा त्या समकक्ष वस्तू, ९ मंडलातून प्रत्येकी एक मोबाईल हँडसेट किंवा टॅब्लेट, ३ परिमंडलातून प्रत्येकी एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाणार आहे. या ग्राहकांमधून प्रत्येक महिन्याला रेफ्रिजरेटरचे एक विशेष बक्षीस दिले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...