आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील कै.गोविंदराव जळगावकर स्मृतीत घेतल्या जाणा-या ९८ व्या श्री दत्त जयंती संगीत महोत्सवाची सांगता गायनाचार्य स्व.गोविंदराव जळगांवकर यांच्या ध्वनीमुद्रित ‘ अवघेचि त्रैलोक्य आनंदची आता ‘ या भैरवीने करण्यात आली. दरम्यान, राग यमन,बागेश्री, बसंत बहार,हेमंत,दरबारी कानडा, वाचस्पती आणि सदाबहार भैरवीच्या श्रवणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
शनिवारचे पहिले सत्र पंडीत शिवदास देगलूरकर यांच्या शिष्यांनी सदरक केलेल्या इशस्तवनाने सुरू झाले. समारोहात नांदेड येथील प्रसिद्ध व्हायोलिनवादक पंकज शिरभाते यांची कन्या व शिष्या असलेल्या गुंजनने राग यमनने वादनास प्रारंभ केला. तिने यमनचा कल्पकतेने विस्तार करीत रागस्वरुप स्पष्ट करीत आपल्या ठायी असलेल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. रागाच्या उत्तररंगात तिच्या वादनातून अवतरलेल्या सुरावटी मिंड,ताना अतिशय स्वच्छ व स्पष्ट जाणवल्या. यानंतर महागामी गुरूकुलाच्या शिष्यांनी ओडिसी नृत्य सादर केले यात शीतल भांबरे, ऐश्वर्या मुंदडा, भार्गवी मेथेकर, आद्या शिंदे, सिद्धी सोनटक्के यांनी ओडिसी नृत्य प्रकार्तिक कौशल्य सादर केले.
गुरू पार्वती दत्ता यांनी मराठवाड्यात कथ्थक आणि ओडिसी नृत्यासाठी महागामी गुरूकुलाच्या माध्यमांतुन मोठी मोलाची भर कला क्षेत्रात घातली आहे. पुणे येथील सौरभ नाईक यांनी आपल्या भारदस्त आवाजात राग बागेश्री आणि त्यानंतर बहार सादर करीत बहार आणली. पं. उल्हास कशाळकर यांचे शिष्य असणाऱ्या नाईक यांच्या गाण्यातील प्रगल्भता त्यांच्या तानातुन आणि लयीशी सहज खेळणाऱ्या गाण्यातून प्रकट होत होती.यानंतर बनारसचे प्रख्यात सतार वादक नरेंद्र मिश्रा यांनी सतार वादन सादर करून रसिकांना स्वरांच्या अनोख्या विश्वात विहार करून आणले.त्यांनी हेमंत रागात आलाप,जोड,झाला सादर करीत एक गत वाजवून रसिकांना रोमांचित केले.
जेष्ठ गायक हेमंत पेंडसे हे अंबडकर रसिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून त्यांचं गाणं ऐकण्यास उत्सुक असतात आणि पं. पेंडसे हेही आपल्या गायनाने रसिकांच्या अपेक्षा पूर्ण करतात. त्यांनी राग दरबारी कानडा आणि राग बसंत सादर केला.विलंबित, मध्य आणि द्रुत लयीतील त्यांच्या रचना या रागातील सौंदर्य स्थळांचे मनोज्ञ दर्शन घडवणाऱ्या होत्या. ९८ व्या दत्त जयंती संगीतोत्सवाचा समारोप पं. विश्वनाथ दाशरथे यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग वाचस्पती सादर केला. विलंबित एकताल आणि द्रुत तीनतालात सादर केलेल्या बंदिशीनी श्रोते तल्लीन झाले. या गायक आणि वादकांना हार्मोनियमवर शांतीभूषण देशपांडे, मंगेश जवळेकर आणि तबल्यावर अनिरुद्ध देशपांडे आणि प्रशांत गाजरे यांची साथ लाभली. संगीत सभेचे सूत्रसंचालन श्रीकांत उमरीकर यांनी केले.
हा संगीतोत्सव समर्थ सांस्कृतिक मंडळ,अंबड, नगर परिषद ,अंबड,श्री.मत्स्योदरी देवी संस्थान, अंबड आणि देवगिरी प्रतिष्ठान यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वी केला. दोन्ही दिवस शहर व परिसरातील रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने संगीत सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्वामींच्या मठातही गानसेवा
समर्थ रामदासांच्या संप्रदायातील अच्यूताश्रम स्वामी यांच्या मठात देखील गायक पं. विश्वनाथ दाशरथे यांनी हजेरी लावली. गतवर्षी कलावंतांनी पुरातन खंडोबा मंदिरात गायन सादर केले होते. यावर्षी त्यांनी समाधी मंदिरात राग विभास सादर केला. त्यांना अनिरुद्ध व शांतीभुषण चारठाणकर बंधूंनी जुगलबंदी करीत उत्कृष्ट साथ केली. जेष्ठ गायक सी.एम . देशपांडे- यांनी कुमार गंधर्वांचे निर्गुणी भजन सादर केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.