आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘जाऊ देवाचिया गांवा, घेऊ तेथेचि विसावा| देवा सांगो सुखदु:ख, देव निवारील भूक| तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लडिवाळे|’ या अभंगातून संत तुकाराम महाराज म्हणतात- आम्ही पांडुरंगाच्या गावाला जाऊ, तिथे विसावा घेऊ.. आमचे सुखदुःख त्याला सांगू..तोच आमच्या दुःखांचे निवारण करणारा आहे.. कारण आम्ही देवाची लाडकी लेकरे आहोत. अशीच काही अवस्था मागील दोन वर्षांपासून विठ्ठलभक्तांची आहे. आयुष्यात एकदातरी घडावी पंढरीची वारी, अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्या विठ्ठलभक्तांना पंढरीची वारी घडवण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. ६ ते १३ जुलैदरम्यान जिल्ह्यातील विठ्ठलभक्तांसाठी तब्बल १२० बसेस पंढरपूरची वाट पकडणार आहे. विशेष म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व बसेस पंढरपुरात मुक्कामी राहणार आहेत.
दोन वर्ष कोरोनात गेले अन् मध्ये एसटीचा देखील संप होता. त्यामुळे येनकेन प्रकारे राहिलेले विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी यंदा वारकरी पायदळ वारीने निघाले आहेत. काही वारकरी व भक्तमंडळी एस. टी. च्या बसने जाण्याची तयारी करत आहे. या वारकरी भक्तांना पंढरी घेऊन जाण्यासाठी एस टी महामंडळाकडून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसमधून जवळपास बारा ते पंधरा हजारांहून अधिक विठ्ठल भक्त प्रवास करु शकतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीला जगभरातून भाविक भक्त विठ्ठल चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल होतात. तेव्हा जालना जिल्ह्यातील भाविक वारीपासून वंचित राहू नये म्हणून एसटी महामंडळाच्या जालना विभागाने पंढरपूर वारीचे नियोजन केले आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून आषाढी एकादशीची वारी झालीच नव्हती. त्यामुळे एसटी महामंडळाचे नियोजन विस्कळीत होऊन दोन वर्षाचे कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न बुडाले होते. परंतु आता सर्व मार्गावरुन बससेवा सुरळीत झाल्याने उत्पन्न वाढले आहे.
वारीसाठी ‘बस आपल्या दारी’
पंढरपूर वारीसाठी एकाच गावातून ३० पेक्षा जास्त प्रवासी मिळाल्यास एसटी महामंडळ बस आपल्या दारी पाठवणार आहे. गावातील भाविक भक्तांना गाव ते पंढरपूर असा वारी योग घडवण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील अाहे. तेव्हा ग्रामस्थांची वारीसाठी पूर्ण आसन क्षमतेची तयारी असल्यास जवळच्या आगारप्रमुखांशी संपर्क साधावा.
प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक, जालना
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.