आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास कधी होणार:भोकरदन : निजामकालीन शाळांचे रुपडे केव्हा पालटणार?

पिंपळगाव रेणुकाई2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मागील अनेक वर्षांपासून निजामकाळातील मोडकळीस आलेल्या व दुरुस्तीस पात्र असलेल्या भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शासनाकडून मोठा निधी प्राप्त झाला आहे. तालुक्यात जवळजवळ ३१ गावांतील ५३ नव्या वर्गखोल्यांसाठी ५ कोटी १४ लाख २० हजार रुपये, तर २४ गावांत मोठ्या दुरुस्तीसाठी ७० लाख २३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषद शाळांनी शाळा लवकर तयार करण्यात याव्या म्हणून तसे प्रस्तावदेखील वरिष्ठांकडे तयार करून पाठवलेले आहेत. परंतु यामध्ये आणखी जिल्हास्तरावरील आणि लोकवर्गणीचा निधी जमा करण्यात आला नाही. हा निधी जमा झाल्याशिवाय शासनाच्या पैशातून हे काम पूर्ण करता येत नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शासनाची तत्परता दिसून येत असली तरी जिल्हास्तरावर आणि लोकवर्गणीतून निधी जमा होण्यास उदासीनता पाहावयास मिळत आहे.

भोकरदन तालुक्यात एकूण ३०४ जिल्हा परिषद शाळा असून यामध्ये १९ हजार ९४७ विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु यातील काही जिल्हा परिषद शाळा निजामकालीन असल्याने यामध्ये बहुतांश वर्गखोल्यांची मोठी दुरवस्था होऊन त्या वर्गखोल्यांना जागोजागी तडे व पावसाळ्यात पत्र्यांना गळती लागत असल्याने शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागते. पावसाळ्यात तर वर्गखोल्यांत पाणी साचत असल्याने शिक्षकांना सुटी द्यावी लागते. त्यामुळे या शाळांना चकाकी मिळावी, यांची पुनर्बांधणी व्हावी म्हणून संबंधित शाळेतील शालेय समिती तसेच जिल्हा परिषद शाळेतील प्राचार्यांनी वारंवार याबाबत मागील अनेक वर्षांपासून सतत पाठपुरावा केल्यानंतर राजमाता जिजाऊ गुणवत्ता विकास अभियानांतर्गत जिल्हाभरातील मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर्बांधणी करण्यास मागील महिनाभरापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तालुक्यात ३१ गावांतील नवीन वर्गखोल्यांसाठी ५ कोटी १४ लाख २० हजार रुपये तर खोल्या दुरुस्तीसाठी २४ गावांत ७० लाख २३ हजार रुपये शासनाने मंजूर केले आहेत. या शासन निधीमध्ये वर्गखोल्यांची पुनर्बांधणी तसेच शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनस्तरावरून ८० टक्के निधी देण्यात येणार आहे. उर्वरित २० टक्के निधीमध्ये दहा टक्के निधी जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून तर आणखी दहा टक्के निधी शालेय समितीच्या माध्यमातून उभा करावा लागतो. लवकरच इतर निधी जमा होऊन कामाला सुरुवात होऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांतून होत आहे.

या गावांत होणार नव्या इमारती : भोकरदन तालुक्याील आन्वा, गोद्री, वडोद तांगडा, दगडवाडी, बोरखेडा, नांजा, बाभूळगाव, दहिगाव, चांदई एक्को, वालसा वडाळा, पिंप्री, कोळेगाव, बोरगाव जहांगीर, जवखेडा ठोंबरे, पेरजापूर, कोदोली, फत्तेपूर, चांदई ठोंबरे, कुंभारी, पिंपळगाव रेणुकाई, कोंदा, बोरगाव तारू, भायडी, जानेफळ गायकवाड, खंडाळा, गोषेगाव, बाभूळगाव, शेलुद, सोयगाव देवी, कठोरा जेनपूर, देहड आदी गावांत जिल्हा परिषद शाळेच्या नव्या इमारती उभ्या राहणार आहेत.

जिल्हास्तरावरील आणि लोकवर्गणीतून निधी जमा व्हावा
भोकरदन तालुक्यातील नवीन इमारत तसेच शाळा दुरुस्तीसाठी शासनाच्या वतीने ८० टक्के निधी खर्च केला जाणार आहे. यामध्ये वीस टक्के शेष निधी आणि दहा टक्के लोकवर्गणीतून निधी जमा होणे गरजेचे आहे. हा निधी जमा झाल्यानंतरच शासनाकडून निधी वितरित केला जाईल. एम. एम. ढवळे, कार्यकारी अभियंता, समग्र शिक्षण विभाग जिल्हा परिषद, जालना

बातम्या आणखी आहेत...