आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्पेक्शन:थर्ड पार्टी इन्स्पेक्शन शिवाय बिले निघणार नाहीत : टोपे

तीर्थपुरी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यात अनेक विभागाचे कामे सुरू असून या सर्व कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट पद्धतीचा असल्याच्या तक्रारी जिल्हाभरात वाढल्या असून. अर्थपूर्ण व्यवहार करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून संबधित कंत्राटदार बोगस व अर्धवट कामे करून पूर्ण बिलं काढत असल्याचे प्रकार सर्रास होत आहेत. या पार्श्वभूमीवर थर्ड पार्टी इंस्पेक्शन झाल्याशिवाय कोणत्याही कामाची बिले निघणार नसल्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

घनसावंगी येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हापोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मधुसूदन कांडलिकर या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनेक गावातील ग्रामस्थांनी शासकीय कामाच्या संदर्भात तक्रारी केल्या होत्या. पालकमंत्री टोपे म्हणाले, मी आता मनापासून ठरवले की जिल्ह्यात सुरू असलेले कोणतेही काम मग ते डीपीडिसी अंतर्गत, आमदार फंड, पंचवीस-पंधरा अंतर्गत सभागृह, शाळा खोली, सबसेन्टर, गावांतर्गत रस्ते, पिडब्ल्यूडी, इरिगेशन किंवा अन्य कुठल्याही विभागाचे काम असो सर्व कामाचे बिले त्याच वेळेस दिले जातील, ज्यावेळेस त्या कामाचे थर्ड पार्टी इंस्पेक्शण होईल. कामाचा दर्जा तपासणारी यंत्रणा पुर्णपणे वेगळी असणार आहे.

एक पारदर्शक काम करणारी एजन्सी नेमून त्या एजन्सीने सर्टीफाय केल्याशिवाय बिल निघणार नाही. अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान घनसावंगी तालुक्यात वाळूचा अवैध उपसा मोठ्याप्रमाणात सुरू असून ओव्हरलोड हायवांच्या डंपरमुळे नवे डांबरी रस्ते खराब होत असून त्याला पायबंद घालण्याच्या सूचना टोपे यांनी यावेळी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...