आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार भगवान भरोसे:ठाकरे सरकार टक्केवारी अन् वसुलीत खूश; पाणी योजनांची हत्या केली, फडणवीसांचा हल्लाबोल

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे सरकार हे टक्केवारी आणि वसुलीत खूश आहे. जनतेच्या प्रश्नाचे सरकारला देणे घेणे नाही. मराठवाड्याची कवचकुंडले या सरकारने मारून टाकली. जनतेच्या समस्या सोडवणार नसाल, तर तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. ते जालन्यात भाजपने आयोजित जलआक्रोश मोर्चात बोलत होते.

सरकार भगवान भरोसे
फडणीस म्हणाले की, मुख्यमंत्री कार चालवतात. सरकार भगवान चालवते. राज्यातले सरकार राम भरोसे आहे. या सरकारला जागे करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. सरकारने जालन्याला एक रुपयाही दिला नाही. हे सरकार पाणीप्रश्नासाठी सरकार गंभीर नाही. या सरकारने पाणी योजनांची हत्या केली, असा आरोपही त्यांनी केला. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती जालन्यात आहे. पैठणच्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असताना जालन्यात 15-15 दिवस पाणी येत नाही. सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढल्याचा घणाघात फडणवीस यांनी केला.

काम बंद करणारे सरकार

फडणवीस म्हणाले, मविआ सरकारमुळे अनेक कामे रखडली आहेत. पाणीप्रश्नासाठी ठाकरे सरकार गंभीर नाही. आमच्या सरकारने 129 कोटी रुपये पाणी योजनेसाठी पैसै दिले. मात्र अडीच वर्षांत ही योजना पुढे गेली नाही. हे सरकार केवळ चालू कामे बंद करण्याचे काम करते आहे. 157 टीएमसी पाणी समुद्रात जाऊ न देता ते गोदावरी खोऱ्यात आणण्याचा प्रयत्न मविआ सरकारने हाणून पाडला. जलयुक्त शिवार योजना ठाकरे सरकारने बंद केली. हे सरकार सगळ्या योजना बंद करते आहे. वैधानिक विकास महामंडळ बंद केले आणि मराठवाड्यावर अन्याय केला. मात्र मंत्र्यांनी ब्र शब्द काढला नाही. मराठवाड्यातील मंत्रीही केवळ पैसा कमविण्यात व्यस्त आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सरकारला झोपू देणार नाही

फडणवीस म्हणाले, जनतेच्या प्रश्नाचे ठाकरे सरकारला काही देणे घेणे नाही. त्यांना गरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी सिंहासन दिले आहे. मात्र, त्यांच्याकडून जनतेसाठी काही काम झाले नाही. 35 हजार कोटी मोदी सरकारने पाणी समस्या सोडविण्यासाठी दिले. मात्र, राज्य सरकारकडून 500 कोटी रुपये देखील खर्च होऊ शकले नाहीत. जालन्याला रोज पाणी मिळणार नाही, तो पर्यंत ठाकरे सरकारला आम्ही झोपू देणार नाही. सरकारमुळे मराठवाड्यातील जनतेच्या पाणी योजना रखडल्याचा आरोपही त्यांनी केला.

मामा चौकातून मोर्चा

फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या नेतृत्वात जालन्यात भाजपचा जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला पाणी प्रश्नावरून चांगलेच घेरले. दानवे म्हणाले, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असताना जालना नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होती. तरीही फडणवीस यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शहराच्या विकासासाठी उपलब्ध निधी उपलब्ध करून दिला. यात अंतर्गत जलवाहिनीसाठी प्रमुख्याने 125 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. मात्र, शहरात पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्याशिवाय स्वच्छता, रस्ते, पथदिवे या संदर्भातील प्रश्नही ज्वलंत आहेत. त्यामुळेच या नागरी प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा असल्याचे दानवे यांनी सांगितले.

राज्य सरकारने काय केले?

दानवे म्हणाले, अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारने राज्याला किाय दिले सांगावे? त्यांना जालन्यातील मोर्चाची दखल घ्यावीच लागेल. येणारा काळ नक्कीच परिवर्तनाचा असेल, असा दावा त्यांनी केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, यापूर्वी औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून भाजपकडून शहरातील पैठणगेट ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...